दोन प्रबळ अमेरिकी सिनेटर्सची विधेयक मांडण्याची घोषणा

अमेरिकी विद्यापीठात शिकायला येणाऱ्या परदेशी लोकांना प्राधान्यक्रमाने एच १ बी व्हिसा देऊन, तसेच परदेशी तंत्रज्ञांना हा व्हिसा देण्याचे प्रमाण मर्यादित करणारे विधेयक मांडण्याचे अमेरिकेतील दोन वरिष्ठ सिनेटर्सनी जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या परदेशात नोक ऱ्यांसाठी जाणाऱ्या तंत्रज्ञांना फटका बसणार आहे. हे विधेयक  सिनेटर चक ग्रॅसले व डिक डय़ुरबान यांनी मांडण्याचे ठरवले असून एच १बी व्हिसासाठी नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागांना प्राधान्यक्रम ठरवावा लागणार आहे. परदेशातील प्रज्ञावान विद्यार्थी येथे शिकायला येत असतील तर त्यांना एच १ बी व्हिसात प्राधान्य दिले जाईल. उच्च कौशल्ये, जास्त वेतन असलेल्यांना याचा ]फटका बसणार नाही, पण अमेरिकी कंपन्या कमी वेतनात परदेशी कर्मचारी घेतात त्याला मात्र आळा बसणार आहे. अमेरिकन कर्मचाऱ्यांना या धोरणात प्राधान्य दिले जाणार आहे. जास्त कौशल्याचे मनुष्यबळ लागेल तेव्हा आधी अमेरिकी लोकांचा विचार करावा लागेल, नंतर परदेशी लोकांचा विचार होईल. अमेरिकी विद्यापीठात कौशल्य मिळवलेल्या परदेशी कर्मचाऱ्यांना मात्र अडचणी येणार नाहीत. कौशल्य असलेले परदेशी कर्मचारी व अमेरिकी लोक यांना समान पातळीवर ठेवणारे हे विधेयक आहे, असे सिनेटच्या न्याय समितीचे अध्यक्ष ग्रॅसले यांनी सांगितले.