देशाच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळावर अद्याप एकाही महिला संचालकाची नियुक्ती केली नाही. याबाबत सेबीने घालून दिलेली मुदत महिन्याभरात संपणार आहे.
भांडवली बाजारात सूचिबद्ध सर्व कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळावरील एक पद महिला वर्गासाठी राखीव ठेवून ते भरणे सेबीने अनिवार्य केले आहे. याबाबत सेबीने फेब्रुवारीमध्ये जारी केलेल्या मार्गदर्शकतत्त्वाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होणार आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) १,४६९ कंपन्या सूचिबद्ध आहेत. पैकी ७५५ कंपन्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत संचालकपदी महिलेची नियुक्ती केलेली नाही. हे प्रमाण ५१ टक्के आहे.
‘प्राइम डाटाबेस’ व ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ यांच्या सहकार्याने ‘इंडियाबोर्ड्स.कॉम’ने याबाबतची आकडेवारी जारी केली आहे. यानुसार, राष्ट्रीय शेअर बाजारातील २६४ कंपन्यांनी संचालक पदावरील महिलांची नियुक्ती केली आहे. सेबीच्या नियमापूर्वी कंपन्यांमध्ये संचालक पदावर असणाऱ्या महिलांची संख्या २० होती.
कंपन्यांच्या संचालक पदावर सध्या असणाऱ्या महिला सदस्यांपैकी ४५ महिला या त्यांच्या प्रमुख प्रवर्तक आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज, जे. के. टायर अ‍ॅण्ड इंडस्ट्रिज, जे. के. सिमेन्ट, एडेलवाइस फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस, एशियन पेन्ट्स, जस्ट डायल, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया यांचा समावेश आहे. २२० महिला या प्रथमच संचालक बनल्या आहेत.
६९ महिला या अ-स्वतंत्र संचालक पदांवर आहेत, तर १३७ महिला पदे ही स्वतंत्र संचालक म्हणून भरली गेली आहेत. संचालक मंडळावर सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व असणाऱ्या कंपनीमध्ये अपोलो हॉस्पिटल्सचा समावेश आहे. कंपनीच्या संचालक मंडळावर गेल्याच महिन्यात चार महिलांची नियुक्ती झाली. समूहाचे मुख्य प्रवर्तक डॉ. प्रताप रेड्डी यांच्या त्या कन्या आहेत. रेणू सूद कर्नाड या सर्वाधिक ८ कंपन्यांवर महिला संचालक म्हणून कार्यरत आहेत.