आरोग्यविमा क्षेत्रातील सर्व कंपन्यांची सामायिक ‘थर्ड-पार्टी एजंट (टीपीए)’ कंपनी असावी, या योजनेवर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे देशातील आघाडीची सामान्य विमा कंपनी न्यू इंडिया अश्युरन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीनिवासन यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील चार सामान्य विमा कंपन्यांचा तरी तसा एकत्रित प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रामुख्याने आरोग्यविमा ग्राहकांच्या दाव्यांच्या निपटाऱ्यात सामान्य विमा कंपन्यांचे मध्यस्थ बनून त्यांना सहाय्य करणारी ‘टीपीए’ या त्रयस्थ कंपनीची भूमिका आजवर महत्त्वाची राहिली आहे. विमा कंपन्यांच्या आरोग्य विमा पॉलिसीधारकांना तत्पर सेवा तसेच देशातील आरोग्यनिगा प्रदात्या सेवा अर्थात रुग्णालयांची सेवा गुणवत्ता आणि खर्चिकता या बाबींवर या ‘टीपीए’चा कटाक्ष राहिला आहे. परंतु आता विमा कंपन्यांपुढेच या टीपीएसारख्या मध्यस्थांवर खर्चिकता आणि सेवाविषयक तक्रारींची समस्या उभी राहिली आहे.  त्याला पर्याय म्हणून विमा कंपन्यांना अशा त्रयस्थ सेवांसाठी स्वतंत्र कंपनीची गरज भासत आहे. न्यू इंडियाव्यतिरिक्त, अन्य तीन सरकारी सामान्य विमा कंपन्या- ओरिएंटल इन्श्युरन्स, नॅशनल इन्श्युरन्स आणि युनायटेड इंडिया इन्श्युरन्स यांची तसेच सरकारी आयुर्विमा कंपनी एलआयसीचीही नव्या ‘टीपीए कंपनी’त भागीदारी असेल. आगामी चार ते सहा महिन्यांमध्ये या सामायिक टीपीए कंपनीचे कार्यान्वयन अपेक्षित असल्याचे श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर अलिकडेच नियुक्ती झालेले श्रीनिवासन यांनी न्यू इंडिया अश्युरन्सच्या अर्धवार्षिक वित्तीय कामगिरीची बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत घोषणा केली. सामान्य विमा क्षेत्रात न्यू इंडिया अश्युरन्सचा जवळपास १५ टक्के बाजारहिस्सा आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये आपला अर्धवार्षिक (एप्रिल ते सप्टेंबर) निव्वळ नफा आधीच्या वर्षांच्या तुलनेत दुपटीने वाढवून २०५.०९ कोटी रुपयांवर नेला आहे. ३० सप्टेंबर २०११ अखेर निव्वळ नफ्याचे प्रमाण ९५.०४ कोटी रु. होते, जे यंदा २१६ टक्क्यांनी वधारले आहे. कंपनीच्या कार्यकलापाच्या सर्व अंगाने आणल्या गेलेल्या कुशलतेच्या परिणामी नफ्याचे प्रमाण सुधारले असल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले. देशातील या अग्रणी आरोग्यविमा कंपनीने या योजनांमध्ये आपल्या दाव्यांचे प्रमाण (क्लेम रेशियो) आधीच्या वर्षांतील १०४.६२ टक्क्यांवरून, चालू वर्षांत सप्टेंबरअखेर ८८.२९ टक्क्यांवर आणले आहे. हे प्रमाण आणखी खाली ८० टक्क्यांवर आणण्याचे आपले लक्ष्य असल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले. तथापि वाहन आणि आगीच्या विम्यात दाव्यांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीच्या निव्वळ नफ्यातील वाढीत सर्वाधिक सुमारे १०० कोटींचे योगदान हे गुंतवणुकांतून मिळविलेल्या उत्पन्नाचे आहे. कंपनीचे गुंतवणूक उत्पन्न सप्टेंबर २०१२ अखेर रु. १,३४२ कोटींवर गेले आहे.