जगातील सर्वात मोठा टू-व्हीलर निर्माती असलेल्या हिरो मोटोकॉर्प लि. (एचएमसीएल) ने कोलंबियामधील व्हिला रिका येथे असलेल्या आपल्या पहिल्या जागतिक निर्माण केंद्रातील कार्याना सुरुवात केली आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मान्युएल सान्तोस आणि हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रकल्पाच्या बांधकामाची सुरुवात झाल्यापासून नऊ महिन्यांच्या आत या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. कोलंबियामधील हा प्रकल्प म्हणजे हिरोचे पाचवे निर्माण केंद्र आहे. उर्वरित चार वाहन जोडणी प्रकल्प हे भारतात आहेत. या प्रकल्पातून वाहनाची विक्री ही अँडीयन राष्ट्रांना केली जाईल. मेक्सिको आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रांना विक्री करण्याच्या दृष्टीनेही या प्रकल्पाचे महत्त्व मोठे आहे. बोगोटाच्या नऋत्येला असलेल्या काऊका राज्यातील व्हिला रिका येथे असलेल्या पार्के सुर फ्री ट्रेड झोनमधील १७ एकरवरील या प्रकल्पाची प्राथमिक क्षमता प्रति वर्ष ८० हजार वाहनांचे निर्माण करण्याची असेल. यानंतर पुढील टप्प्यात १.५० लाख वाहने उत्पादन करण्याचा मानस आहे. या प्रकल्पामध्ये ७ कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रकल्पामध्ये मोटरसायकल आणि स्कूटरचे निर्माण करण्यात येणार आहे.