उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल अशा ‘विद्यालक्ष्मी’ या विशेष संकेतस्थळाचे अनावरण गुरुवारी सरकारने केले. स्टेट बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया आदी विविध पाच बँकांनी या संकेतस्थळाशी आपल्या शैक्षणिक कर्ज सुविधांसंबंधी अद्ययावत माहिती जोडली आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रमा’ची घोषणा केली होती. माहिती-तंत्रज्ञानावर आधारित सर्व शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज व तत्सम विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अर्थसहाय्याचे एकसूत्री स्रोत या नात्याने हे संकेतस्थळ पुढे आले आहे.
स्वातंत्र्यदिनापासूनच विद्यालक्ष्मी (६६६.५्र८िं’ं‘२ँ्रे.ू.्रल्ल) संकेतस्थळ सुरू झाले आहे. एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. द्वारे संचालित व देखरेख ठेवल्या जाणाऱ्या या संकेतस्थळाच्या विकसनात केंद्रीय अर्थ मंत्रालयातील वित्तीय सेवा विभाग, केंद्रीय उच्च शिक्षण विभाग, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि भारतीय बँक्स महासंघ (आयबीए) यांच्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांची दखल घेण्यात आली आहे.
वेगवेगळ्या बँकांकडे कर्जासाठी खेटे घालण्यापेक्षा, विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर उपलब्ध माहिती पडताळून, आवश्यक तितक्या गरजेच्या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज सादर करता येईल. बँका मग विद्यार्थ्यांच्या अर्जाची दखल घेऊन पुढील प्रक्रिया पार पाडतील. सध्या तरी १३ बँकांनी त्यांच्या २२ प्रकारच्या शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती सादर केली असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले. पुढे जाऊन सर्वच बँकांची या संकेतस्थळावर मोट बांधली जाणार आहे.