देशातील नियामक यंत्रणांचे इतिहासातील पहिले विलीनीकरण सोमवारी मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री  अरुण जेटली यांनी केलेल्या घंटानादाने पार पडले. वायदा बाजार आयोगाचे सेबीमध्ये विलीन करून घेण्याची प्रक्रिया संपुष्टात येऊन नव्या नियामकाची एकत्र मोट बांधण्यात आली आहे.
भांडवली बाजार नियामक सेबीच्या अखत्यारित वायदे बाजार आयोगाचा कार्यभार आला असून उभय दोन नियामकांचे एकत्रीकरण अस्तित्वात आले आहे.
वायदा बाजाराचे सेबीमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर वायदा बाजारात विश्वास निर्माण करण्याचे पहिले लक्ष्य असल्याचे ‘सेबी’चे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी सांगितले. वायदा बाजार आयोग हा सहा दशके जुना असून या मंचाच्या अखत्यारित येणाऱ्या एनएसईएल घोटाळ्याची कारवाई सेबीला आपल्याकडे घ्यावी लागली होती.
कंपन्यांचे व्यवहार आपल्या मंचावर नोंदवून घेणाऱ्या बाजारांच्या नोंदणीची नवी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केली जातील, अशी माहितीही सिन्हा यांनी यावेळी दिली. सध्या एमसीएक्स हा केवळ एकच बाजार सूचिबद्ध आहे.
याचबरोबर वायदा बाजार व्यवहारात विदेशी गुंतवणूकदार संस्थांना शिरकाव करणे सुलभ होण्यासाठीची पावले लवकरच उचलली जातील, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. वायदा बाजारातील व्यवहारात बँकांच्या सहभागाबरोबरच या मंचावर अधिक उत्पादने, वस्तू आणल्या जातील, असे सिन्हा यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उपस्थित अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, या बाजारात विश्वास व अधिक पारदर्शकतेची गरज मांडली. उत्कृष्ट नियामकाद्वारे हे शक्य असून शेतकरी, उत्पादक तसेच ग्राहकांमध्ये वायदा बाजार हे मुक्त वातावरणातील एक प्रक्रिया असल्याचा विश्वास उंचावण्याचे लक्ष्य हवे, असे जेटली म्हणाले.
वायदा बाजार आता विश्वासू, सार्थ नियामकाच्या हातात असून सेबीने आतापर्यंत विविध बाजारांची यशस्वी हाताळणी केली आहे, अशा शब्दात एनसीडीईएक्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर शाह यांनी नव्या व्यवहाराचे स्वागत केले आहे. भांडवली बाजार नियामक सेबीची स्थापना १९८८ ची असून तिच्या स्वतंत्र व्यवहारास प्रत्यक्षात १९९२ मध्ये सुरुवात झाली. तर वायदा बाजार आयोग १९५३ मध्ये अस्तित्वात आला. देशात तीन राष्ट्रीय तर सहा विभागीत बाजार मंच आहेत. त्यांची एकत्रित उलाढाल २०१४-१५ मध्ये ६० लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे.
चालू आठवडय़ातील प्रारंभी समभाग विक्रीसाठी (आयपीओ) बेल्ला कासा फॅशन अँड रिटेल  (जयपूर), विशाल बेअिरग्स (राजकोट), कावसजी बेहरामजी केटिरग सíव्हसेस (मुंबई), वाकसन्स ऑटोमोबाइल्स (दिल्ली),  तेजनक्ष हेल्थकेअर (मुंबई), फ्रँकलिन लीजिंग अँड फायनान्स (दिल्ली) आणि पीडीएम ज्वेलरी (मुंबई) यांनी सेबीकडे अर्ज केला आहे.