जपानी कंपनी होंडाची हॅचबॅक श्रेणीतील ‘जॅझ’ ही कार लवकरच पुन्हा भारतीय रस्त्यांवर अवतरणार आहे. कंपनीने या कारचे उत्पादन व विक्री बंद करत काही निवडक श्रेणीतील वाहनांवरच गेल्या काही वर्षांमध्ये लक्ष केंद्रित केले होते.
मारुती आणि ह्युंदाईच्या स्पर्धेत उतरविण्यात आलेल्या जॅझला फार काही चांगला प्रतिसाद लाभला नव्हता. याच श्रेणीतील ब्राओ सादर करण्यात आल्यानंतर तर जॅझही मागे पडली. यानंतर कालांतराने कंपनीने जॅझचे उत्पादन थांबविले होते.
कंपनी आता हीच कार नव्या स्वरूपात पुन्हा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्याबाबतची कंपनीची चाचपणी झाली आहे. पेट्रोलबरोबरच डिझेलवरही धावणारी नवी जॅझ पुढील वर्षांत येण्याची शक्यता होंडा कार्स इंडियाच्या विपणन व विक्री विभागाचे वरिष्ट उपाध्यक्ष जनेश्वर सेन यांनी सांगितले.
होंडा कंपनी सध्या तिच्या निवडक पाच वाहन उत्पादनांवर भर देत असून वेगाने वाढणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही, क्रॉसओव्हर किंवा हायब्रीडसारख्या प्रकारात तूर्त उतरण्याचा कोणताही मानस नसल्याचे कंपनीच्या सर्वसाधारण व्यवहार विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व संचालक रमण कुमार शर्मा यांनी सांगितले.
नोएडातील फेब्रुवारीमधील आंतरराष्ट्रीय वाहन मेळाव्यात मांडलेली मोबिलिओ हे वाहन कंपनीने गुरुवारी मुंबईत सादर केली. बहुपयोगी वाहन प्रकारातील (एमपीव्ही) या सात आसनी वाहनाची किंमत ६.४९ ते १०.८६ लाख रुपयांदरम्यान (एक्स शोरूम – नवी मुंबई) आहे.
पेट्रोल व डिझेल प्रकारावरील सात प्रकार व सात रंगांत मोबिलिओ उपलब्ध आहे. होंडा मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी योशियुकी मात्सुमोतो, होंडा कार्स इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोनोरी कानायामा हे या वेळी उपस्थित होते. भारतात हायब्रीड कार बनविणारी होंडा ही पहिली कंपनी आहे. २००८च्या सुमारास तिची सेदान श्रेणीतील सिव्हिक कार बाजारात आली होती.