संथ अर्थव्यवस्थेचा भाग बनलेल्या उद्योग क्षेत्राने रिझव्र्ह बँकेच्या लवकरच्या व्याज दरकपातीने देशात एकूणच गुंतवणूकपूरक वातावरण निर्माण होण्याचा आशावाद जमेस धरला आहे. भविष्यातही मध्यवर्ती बँकेमार्फत असेच पाऊल उचलण्याची अपेक्षा व्यक्त करत अर्थव्यवस्थेचे ‘इंजिन’ समजले जाणाऱ्या उद्योगाने स्वत:च्या भांडवली खर्चात कपात होऊन त्याचा लाभ होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
रिझव्र्ह बँकेकडून व्याज दरकपातीसाठी धोशा लावणाऱ्यांमध्ये अग्रणी असलेल्या उद्योग जगताने गव्हर्नर डॉ. राजन यांच्या निर्णयाचे परिणाम देशात गुंतवणूक त्वरित वाढविण्यावर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. व्याज दरकपातीमुळे ग्राहकोपयोगी मागणी विस्तारून उद्योग क्षेत्रालाही चालना मिळण्याची आशा या निमित्ताने या घटकाने व्यक्त केली आहे.
‘फिक्की’ या उद्योग संघटनेच्या अध्यक्षा ज्योत्स्ना सुरी म्हणाल्या की, रिझव्र्ह बँकेच्या रेपो दरकपातीची ही सुरुवात आहे, असे म्हणता येईल. याचा परिणाम बँकांकडून व्याज दरकपातीवर होऊ लागल्याचेही त्वरित दिसून येत आहे.
‘सीआयआय’चे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, रेपो दरातील पाव टक्का कपात ही आश्चर्यकारक निश्चितच म्हटली पाहिजे. नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच हे घडल्याने गुंतवणूकदारांचा कलही वाढू शकतो. गेल्या काही कालावधीपासून त्या दृष्टीने मागणी असूनही फारसा प्रतिसाद नव्हता.