गेल्या पाच वर्षांत भारतात शेअर बाजार केवळ सामान्य गुंतवणूकदारांसाठी केवळ जिकीरीचा ठरला असे नाही, तर दलाल पेढय़ांसाठी तो जिवघेणा ठरला आहे. लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या एचएसबीसी या बँकेने पाच वर्षांपूर्वी भारतात सुरू केलेला किरकोळ ब्रोकरेज आणि डिपॉझिटरी व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेऊन याचा प्रत्यय दिला आहे. पण यातून देशातील तिच्या ३०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड चालविली गेली आहे.
पाच वर्षांपूर्वी वित्तीय जगताला हादरे अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स कोसळत असताना, मे २००८ मध्ये नव्यानेच या क्षेत्रात प्रवेश केला होता. आता वर्षभरापूर्वी घेतलेल्या व्यवसाय आढावा धोरणानुसार माघारीचे पाऊल उचलले असल्याचे कंपनीने गुरुवारी स्पष्ट केले. स्थानिक शेअर बाजारातील अस्थिरतेपोटी व्यवसाय बंद करण्याचा तिने निर्णय घेतला गेल्याचे मानले जात आहे.
एचएसबीसी इंडियाने भारतात भांडवली बाजाराशी निगडित किरकोळ ब्रोकरेज आणि डिपॉझिटरी व्यवसाय सुरू करताना पाच वर्षांपूर्वी २४.१६ कोटी डॉलर मोजून आयएल अ‍ॅण्ड एफएस इन्व्हेस्टस्मार्टमधील ७३.२१ टक्के हिस्सा ताब्यात घेतला. त्यानंतर खुल्या समभाग विक्रीद्वारे ९३ टक्के हिस्सा मिळविताना एकूण गुंतवणूक २९.६४ कोटी डॉलपर्यंत विस्तारली.
‘एचएसबीसी इन्व्हेस्टडायरेक्ट सिक्युरिटीज’च्या नावाखाली सुरू असलेला हा व्यवसाय आता कोणालाही न विकता थेट बंद करण्याचीच घोषणा कंपनीने केली आहे. मे २०११ मध्ये व्यवसाय आढावा घेण्याच्या घोषणेनुसारच हा निर्णय घेतल्याचा दावा कंपनीने केला आहे. या निर्णयामुळे ३० शाखांमधील प्रभावित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आल्याचेही कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या ग्राहकांना सेवेच्या अंतिम तारखेची कल्पना देण्यात आली असून तोपर्यंत सेवा सुरू ठेवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. एचएसबीसी समूहात ३० हजारांहून अधिक मनुष्यबळ आहे.