आघाडीची मोबाइल उत्पादक एचटीसीने ४जी तंत्रज्ञानावरील स्मार्टफोन अवघ्या २० हजार रुपयांत उपलब्ध करून देण्याचा शब्द उत्सुक खरेदीदारांना दिला आहे. कंपनीने याच तंत्रज्ञानावर आधारित एम९ प्लस हा ५२,५०० रुपयांचा मोबाइल मंगळवारी सादर केला. तो येत्या महिन्यापासून भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होईल, असे या वेळी कंपनीचे अध्यक्ष चिआ-लिन चॅन्ग यांनी सांगितले.
दूरसंचार क्षेत्रात ४जी तंत्रज्ञानावरील सेवा विस्तारत आहे. भारती एअरटेल, एअरसेलसारख्या कंपन्यांची ही सेवा सध्या देशातील निवडक शहरांमध्येच उपलब्ध आहे. जलद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सेवेचा प्रारंभ मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओही लवकरच करणार आहे.
भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत ७ टक्के हिस्सा राखण्यापत पोहोचलेल्या एचटीसीने येत्या वर्षभरात १० टक्के बाजारपेठेचे लक्ष्य राखले आहे. नव्या ५.२ इंच स्क्रीन व २के रिझोल्यूशन असलेल्या एम९ प्लससह आणखी काही फोनच्या सहकार्याने हे लक्ष्य पार केले जाईल, असे कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाचे अध्यक्ष फैसल सिद्दीकी यांनी सांगितले.

५२,५०० रुपयांचा एम९ प्लस मेपासून होणार उपलब्ध!
* नव्या फोनमध्ये २० मेगा पिक्सल कॅमेरा असून ३ जीबी रॅम व ३२ जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता आहे.
* मेमरी कार्डद्वारे ती २ टेराबाइट्सपर्यंत ती विस्तारता येते.
* कंपनी वन ई९ व डिझायर ३२६ जी हे दोन फोनही येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय बाजारपेठेत उतरविणार आहे.

आलिशान घरासह सुरक्षित क्रीडांगणाची सोय हवी!
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />लहानग्यांसाठी क्रीडांगण, आऊटडोअर फिटनेस जिमच्या रचना व निर्मितीतील अग्रेसर कंपनी कूची प्ले सिस्टीम्स प्रा. लि.ने सुरक्षित, दर्जेदार आणि टिकाऊ खेळाच्या साहित्याने सुसज्ज असे क्रीडांगण हे प्रत्येक निवासी प्रकल्पासोबत आवश्यक बाब असल्याचे बांधकाम विकासक आणि बिल्डरांसह घरइच्छुकांमध्ये जागरुकतेची मोहीम सुरू केली आहे.
आंतरराष्ट्रीय मानदंडांनी प्रमाणित आणि संपूर्ण सुरक्षित अशी ‘कूफिट’ या नावाने कंपनीने मैदानात बसवावयाच्या क्रीडा साहित्याची श्रेणी प्रस्तुत केली असून, या सामग्रीने सुसज्ज एक छोटेखानी क्रीडांगण हे ३ ते १० लाख रुपयांत उभारण्याची योजना बांधकाम विकासक, शाळा, हॉटेल्स, रिसॉर्ट्ससाठी प्रस्तुत केली आहे. कूची प्ले सिस्टीम्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक रॉबेन दास यांच्या मते, ४०० कोटी ते १००० कोटी रुपयांच्या दरम्यान असणाऱ्या निवासी प्रकल्पासाठी १० ते ३० लाख रुपये क्रीडांगण, फिटनेस जिमसाठी खर्च करणे अवघड नसावे. परंतु काही लाख वाचविण्यासाठी बाजारात उपलब्ध हलक्या दर्जाची उपकरणे घेऊन सदनिकाधारकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी तडजोड केली जाते, असे दास यांनी सांगितले.
भारतात सर्वत्र आणि विशेषत: बडय़ा शहरांमध्ये घटत चाललेले क्रीडांगणे, मैदानांचे प्रांगण पाहता, प्रत्येक नव्या गृहनिर्माण संकुलात त्यांची सुसज्जता ही आवश्यक पूर्वअट असेल, याची खातरजमा घरइच्छुकांनीच करायला हवी, असे त्यांनी सांगितले. कूची प्ले सिस्टीम्सने अल्पावधीत देशात १०० ठिकाणी सुसज्ज क्रीडांगणांची उभारणी केली असून, सध्या ६ कोटींच्या घरात असलेली उलाढाल वर्षअखेर २० कोटींवर पोहोचणे अपेक्षित आहे.

‘सियाराम’ महिलांसाठीच्या तयार वस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात
मुंबई: पुरुषांसाठीच्या तयार वस्त्रप्रावरणे क्षेत्रातील सियाराम समूहाने महिला वर्गासाठीच्या वस्त्रनिर्मितीत शिरकाव केला असून समूहाच्या सिया या नव्या नाममुद्रेचे अभिनेत्री परिणिती चोप्रा हिच्या हस्ते सोमवारी मुंबईत अनावरण करण्यात आले.
सियाच्या नव्या बोधचिन्हाच्या उद्घाटनाबरोबरच परिणितीला या नाममुद्रेसाठी राजदूत म्हणून घोषित करण्यात आले. ७०० रुपयांपासून सुरू होणारे सिया कपडे कंपनीच्या देशभरातील एक लाखांहून अधिक दालनांमध्ये उपलब्ध होतील, अशी माहिती सियाराम सिल्क मिल्सचे कार्यकारी संचालक कृष्ण पोद्दार यांनी दिली. तीन दशके जुन्या सियारामसाठी यापूर्वी सैफ अली खान, हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, महेश भूपती आदींनी राजदूत म्हणून भूमिका वठविली आहे. महाराष्ट्रातील तारापूरसह दमण, सिल्व्हासामध्ये प्रकल्प असलेल्या सियाराममार्फत वर्षांला ६ कोटी मीटर वस्त्र तयार केले जाते.

‘निरुत्साहा’पायी ५,००० कोटींच्या प्रारंभिक भागविक्रीला मोडता!
नवी दिल्ली: किरकोळ गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याबाबत साशंकता असल्याने भांडवली बाजारात धडक देण्यास विविध ११ कंपन्या अजून धजावलेल्या नाहीत. त्यांच्यामार्फत ५ हजार कोटी रुपयांहून अधिकची निधी उभारणी प्रतीक्षेत आहे.
भांडवली बाजाराचा कल गेल्या काही महिन्यांपासून तेजीचा आहे. जानेवारी २०१५ पासून तर त्यात गुंतवणूकदारांना दुहेरी आकडय़ातील परतावा मिळाला आहे. सोमवारीही सेन्सेक्स २९ हजारांवर तर निफ्टी ८,८०० वर गेला होता. असे असले तरी किरकोळ गुंतवणूकदारांकडून आपल्या प्रारंभिक विक्री प्रक्रियेला कितपत प्रतिसाद मिळेल, या साशंकतेने ११ कंपन्या सेबीकडून परवानगी मिळूनही बाजारात अद्याप उतरू शकल्या नाहीत. २०१५ मध्ये आतापर्यंत आयनॉक्स विन्ड, अ‍ॅडलॅब्ज एन्टरटेनमेन्ट व ऑर्टेल कम्युनिकेशन या तीनच कंपन्यांनी भांडवली बाजारात धडक दिली आहे.