खुल्या बाजारात वाहनांच्या सुटय़ा भागावरून देशातील वाहननिर्मिती व्यवसाय पुन्हा एकदा दंडाच्या जाळ्यात ओढला गेला असून यंदाच्या फेऱ्यात कोरियन ह्य़ुंदाई मोटर इंडियाला ४२० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने ह्य़ुंदाईबरोबरच महिंद्र रेवा तसेच प्रीमियर लिमिटेड या कंपन्यांवरही बडगा उगारला गेला आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाने ऑगस्ट २०१४ मध्ये वाहन कंपन्यांना केलेल्या दंडानंतर आता एकत्रित रक्मक २,५४४.६४ कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी १४ कंपन्यांबाबत आयोगाने आदेश दिले होते. यंदा ह्य़ुंदाईला ४२० कोटी रुपयांचा दंडाचे आदेश जारी करण्यात आले असून महिंद्र रेवा व प्रीमियरला शिस्तीचा अवलंब करण्याबाबत बजाविले आहे. ह्य़ुंदाईच्या दंडाची रक्कम ही कंपनीच्या तीन आर्थिक वर्षांतील सरासरी उलाढालीपैकी २ टक्के आहे.

१७ कंपन्या अडकल्या
वाहनांचे सुटे भाग खुल्या बाजारात उपलब्ध न करून देण्यावरून भारतीय वाहन उत्पादक कंपन्या वेळोवेळी चर्चेत आल्या आहेत. गेल्या वेळच्या दंडाच्या फेऱ्यात होन्डा सिएल, फियाट, फोक्सव्ॉगन, बीएमडब्ल्यू, फोर्ड, जनरल मोटर्स, हिंदुस्थान मोटर्स, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, मारुती सुझुकी अशा १७ कंपन्या अडकल्या होत्या. त्यांच्या सुटय़ा भागाबाबतची सुनावणी पुढे नेतानाच आयोगाने यंदा ह्य़ुंदाईला लक्ष्य केले आहे. नव्या आदेशात महिंद्र रेवा व प्रीमियरला आर्थिक दंड करण्यात आला नसला तरी त्यांना इशारा देण्यात आला आहे.