गोव्यातील पहिल्या हॉटेलपासून सुरुवात

मध्यम श्रेणीच्या हॉटेल्सची जागतिक शृंखला असलेल्या अ‍ॅकॉर हॉटेल्स, मुख्यत: ऐषाराम व सहलीला निघालेल्या कुटुंब घटकाला आकर्षित करणाऱ्या ‘आयबीस स्टाइल्स’ या नाममुद्रेचे भारतात गोव्यातील पहिल्या हॉटेलपासून शुभारंभ केला. पर्यटकांचा आकर्षण बिंदू असलेल्या कलंगुट समुद्रकिनाऱ्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या १९७ खोल्यांच्या हॉटेलचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. येत्या काळात याच बाजार घटकांवर लक्ष केंद्रित करून विस्ताराचे कंपनीचे नियोजन आहे.

जगभरात १८००हून अधिक हॉटेल्स मालमत्ता असलेल्या अ‍ॅकॉर हॉटेल्सच्या गोव्यातील या पहिल्या ‘आयबीएस स्टाइल्स’ मालमत्तेची मालकी व संचालन इंटरग्लोब हॉटेल्सद्वारे होत आहे. किफायती हवाई सेवा इंडिगो एअरलाइन्सची प्रवर्तक इंटरग्लोब एंटरप्राइजेस आणि अ‍ॅकॉर हॉटेल्सदरम्यान ६०:४० धाटणीच्या संयुक्त भागीदारीतून इंटरग्लोब हॉटेल्सची स्थापना करण्यात आली आहे. उभयतांकडून विशेषत: व्यवसाय-व्यापारानिमित्त भटकंती करणाऱ्यांसाठी बजेट हॉटेल्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयबीएस नाममुद्रेची १४ हॉटेल्स देशात विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. डिसेंबपर्यंत आणखी पाच तर आगामी २०१७ सालात आणखी १० आयबीएस हॉटेल्सचे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे, अशी माहिती इंटरग्लोब हॉटेल्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जे. बी. सिंग यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. उभयतांकडून आजवर १८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली असून, पुढील विस्तारासाठी आणखी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. अ‍ॅकॉर हॉटेल्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष जाँ मिशेल कॅसे हेही या समयी उपस्थित होते.

गोवा हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर व सुरक्षित पायाभूत सुविधा असलेले देशातील मुख्य केंद्र असून, येथील सांस्कृतिक व सामाजिक अवकाशही पर्यटकांच्या आदरातिथ्याला साजेशा आहे, अशी पुस्ती सिंग यांनी जोडली. त्यामुळे जरी आयबीएस नाममुद्रेचे गोव्यात उशिराने पदार्पण झाले असले तरी अनेक अनोखी वैशिष्टय़े सामावलेल्या ‘आयबीएस स्टाइल्स’च्या शुभारंभासाठी गोव्याखेरीज अन्य कोणतेही ठिकाण आपल्यापुढे नव्हतेच, असेही ते म्हणाले.

गोव्यावर प्रभाव असलेल्या पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा जपणारी अंतर्बाह्य़ रचना, आहार व खान-पानांतही तीच लज्जत आणि निम्म्याहून अधिक स्थानिक कर्मचारी वर्गाला सामावून गोव्यातील हे आयबीएस स्टाइल्स हॉटेल्स सुरू झाले आहे, अशी या हॉटेलचे महाव्यवस्थापक निखिल शिरोडकर यांनी माहिती दिली. कासा आणि साल असे प्रत्येकी ६० आणि १३७ खोल्या असलेल्या दोन स्वतंत्र इमारती आणि प्रत्येक खोलीचा दर्शनी भाग हा तरण तलावाकडे तोंड करणारा अशी अपवादानेच आढळणारी खास रचना या हॉटेलसाठी केली गेली आहे. आयबीएस हॉटेलच्या तुलनेत येथील खोल्या आकाराने मोठय़ा आणि पाहुण्यांना आरामाच्या दृष्टीने अधिकतम सोयींनी युक्त आहेत. शिवाय कुटुंबीयांसह येणाऱ्या पाहुण्यांचे आकर्षण ठरेल असे विविध मनोरंजन, खेळ व स्पर्धात्मक उपक्रम हॉटेलमध्ये निरंतर सुरू असतील, असे शिरोडकर म्हणाले.