वेगाने वाढणाऱ्या मोबाइल बँकिंग व्यासपीठावर भारतीय बँकांनी जून २०१४ मध्ये ४,००० कोटी रुपयांची उलाढाल नोंदविली असून, महिन्यात सर्वाधिक एक हजार कोटी रुपयांचे व्यवहार खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एकटय़ा आयसीआयसीआय बँकेने पार पाडले आहेत.
जूनमध्ये भारतीय बँकांनी ३,९८५ कोटी रुपयांचे व्यवहार मोबाइलमार्फत नोंदविले आहेत. म्हणजेच बँक खातेदारांनी माहिती तंत्रज्ञानाच्या या व्यासपीठाचा वापर मोठय़ा प्रमाणात केल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. मात्र आयसीआयसीआय बँकेने सर्व बँकांना मागे टाकत जून २०१४ मध्ये सर्वाधिक १,०२१ कोटी रुपयांचे व्यवहार नोंदविले आहेत.
एका महिन्यात एवढय़ा मोठय़ा रकमेचे व्यवहार अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावर पार पाडणारी ही बँक देशातील पहिली बँक ठरली आहे. तर या कालावधीतील बँकेच्या व्यवहारांची संख्या १९.५० लाख झाली आहे. आयसीआयसीआय बँकेने गेल्या वर्षी मोबाइल बँकिंग तंत्रज्ञान सुविधा आपल्या खातेदारांना उपलब्ध करून दिली होती. मोबाइलद्वारे विविध सेवांचा शुभारंभ बँकेने २००२ मध्येच सुरू केला होता, अशी माहिती बँकेचे सर व्यवस्थापक व ‘डिजिटल चॅनेल’च्या प्रमुख अबोंती बॅनर्जी यांनी दिली.
एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत आयसीआयसीआय बँकेने २,६३५ कोटी रुपयांचे व्यवहार मोबाइलद्वारे नोंदविले आहेत. गेल्या आर्थिक वर्षांतील ५,७४१ कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम निम्मी आहे. यंदाच्या तिमाहीत नोंद ही तिप्पट राहिली आहे. एप्रिल ते जून २०१३ दरम्यान बँकेचे या व्यासपीठावरील व्यवहार ९४१ कोटी रुपये होते.