आयसीआयसीआय लोम्बार्डची ५,७०० कोटींची भागविक्री

* आयसीआयसीआय समूहातील दुसऱ्या कंपनी गुंतवणूकदारांना आजमावणार

* १५ सप्टेंबरपासून प्रारंभिक भागविक्री खुली

* प्रति समभाग किंमत पट्टा ६५१ ते ६६१ रुपयांदरम्यान

खासगी क्षेत्रातील आयुर्विमा तसेच सर्वसाधारण विमा कंपन्यांची भांडवली बाजाराच्या माध्यमातून निधी उभारण्याकरिता लगबग सुरू झाली असतानाच या क्षेत्रातील व आयसीआयसीआय समूहातील कंपनीने आघाडी घेतली आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने प्रारंभिक समभाग विक्री प्रक्रियेची घोषणा शुक्रवारी केली. यानुसार प्रति समभाग ६५१ ते ६६१ रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून या माध्यमातून ५,७०० कोटी रुपये उभारले जाणार आहेत.

१५ ते १९ सप्टेंबरदरम्यान चालणाऱ्या या प्रक्रियेकरिता बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि आयआयएफएल हे बँकर म्हणून आपली भूमिका पार पाडणार आहेत. चालू आठवडय़ातच भांडवली बाजार नियामक सेबीची याकरिता परवानगी मिळालेली ही पहिली खासगी सर्वसाधारण विमा कंपनी आहे.

या माध्यमातून कंपनीतून प्रवर्तक आपला १९ टक्के हिस्सा कमी करणार आहेत. कंपनीत सध्या आयसीआयसीआय बँक व कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शिअल होआिल्डंग्ज यांचा सर्वाधिक हिस्सा आहे. प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेदरम्यान ८.६२ कोटी समभाग उपलब्ध केले जाणार असून पैकी ३ कोटी समभाग हे आयसीआयसीआय बँकेचे असतील.

याबाबतची घोषणा आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर व आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भार्गव दासगुप्ता यांनी शुक्रवारी मुंबईत केली.

आयसीआयसीआय बँकेच्या ताफ्यातील ही दुसरी प्रारंभिक विक्री प्रक्रिया असेल. यापूर्वी कंपनीच्या आयुर्विमा कंपनीची प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर कंपनी बाजारात सूचिबद्ध झाली.

सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी तसेच खासगी क्षेत्रातील एसबीआय लाइफ व एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ या दोन आयुर्विमा कंपन्यांनाही प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. या कंपन्यांना अद्याप सेबीची परवानगी मिळालेली नाही.