बाजारात येणाऱ्या पहिल्या विमा कंपनीचे पहिले पाऊल निराशेचे

भांडवली बाजारातील गुरुवारच्या आपटीच्या फेऱ्यात देशातील पहिल्या विमा कंपनीच्या भांडवली बाजारातील मुहूर्ताला काहीसा नकारात्मक राहिला. खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्सचा समभाग सत्रअखेर तब्बल ११ टक्क्यांनी घसरला.

समभागाला २९७.६५ रुपये भाव मिळाला. ३३४ रुपये वितरीत तुलनेत हे प्रमाण १०.८८ टक्क्यांनी कमी होते. सत्रात त्याचे मूल्य २९५.५० पर्यंत खाली होते. दिवसअखेर कंपनीचे एकूण बाजारमूल्य ४२,७२२.४२ कोटी रुपये राहिले.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या या प्रत्येकी ३०० ते ३३४ रुपये किंमतपट्टय़ाने १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान झालेल्या ६,०५७ कोटी रुपयांच्या प्रारंभिक खुल्या भागविक्रीला गुंतवणूकदारांकडून १० पट अधिक भरणा होऊन चांगला प्रतिसाद मिळाला.

२०१० मधील कोल इंडियाने भागविक्रीच्या माध्यमातून उभारलेल्या १५,००० कोटी रुपयांच्या भागविक्रीनंतरची आयसीआयसीआय प्रुडेन्शियलची ही दुसरी मोठी भांडवल उभारणी प्रक्रिया होती.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलने गेल्या चार ते पाच वर्षांत वार्षिक सरासरी १५ टक्के वाढ नोंदविली आहे. तर देशातील जीवन विमा उद्योगाची वाढ ही ११ ते १३ टक्के राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वीही ती १० टक्क्यांच्या आसपास राहिली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बक्षी यांनी, गेल्या काही वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत देशातील विमा क्षेत्राची वाढ दुपटीने नोंदली गेली आहे, असे नमूद केले आहे.

देशातील विमा उद्योगाच्या वाढीपेक्षा आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलची व्यवसाय गती नेहमीच चांगली राहिली आहे. पहिली विमा कंपनी म्हणून बाजारात सूचिबद्धतेनंतरही आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलची कामगिरी अशीच असेल.

  • चंदा कोचर, व्यवस्थापकीय संचालिका व मुख्याधिकारी आयसीआयसीआय बँक.