प्राप्तिकर विभागाचा संशय; लाखो खातेधारक चौकशीच्या रडारवर

निश्चलनीकरण कालावधीत बँकेतील खात्यांमध्ये प्रत्येकी २ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झालेल्या ६० लाख बँक खात्यांवर सरकारची नजर असून पैकी जमा ४ लाख कोटी रुपये हे बेहिशेबी संपत्तीतून असल्याचा संशय आहे. असे खातेधारक व त्यांच्या जमा रकमेवर दंड तसेच कराचा बडगा प्राप्तिकर विभागातर्फे उगारला जाण्याची शक्यता आहे.

निश्चलनीकरणाच्या  ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधी दरम्यान चलनातून बाद ठरलेल्या जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बँकांच्या खात्यात जमा करण्यात आल्या. अशा प्रति खाते २ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा होणाऱ्या बँक खात्यांची संख्या ६० लाखांच्या वर असल्याचे सांगितले जाते. जुन्या नोटांच्या रूपात अशा खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम ७.३४ लाख कोटी रुपये असल्याचेही कळते. पैकी ६.८० लाख बँक खात्यांतील रकमेच्या संपत्तीच्या वैध स्रोतासंबंधी खातेधारकांकडून खुलासा झाला आहे. शिवाय कायम खाते क्रमांकाची (पॅन) खात्यांशी संलग्नता आहे.  तेव्हा विवरण दिलेला मिळकतीचा स्रोत आणि बँक खात्यातील रक्कम यांचा ताळमेळ न लागणाऱ्या उर्वरित बँक खात्यातील रकमेवर टांच येऊ शकते, असे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

[jwplayer lIbk7RZD]

जुन्या नोटा जमा झालेल्या बँक खात्यांची प्राप्तिकर विभागाने क्षेत्रीय, बँक प्रकारानुसार वर्गवारी केली असून सक्तवसुली संचालनालय, अन्य कायदे अंमलबजावणी संस्था यांच्या माहितीच्या आधारे संबंधित बँक खात्याबाबत पडताळणी करण्यात येत आहे.

प्रति खाते २ ते २.५० लाख रुपये जमा झालेल्या बँक खात्यातील रक्कम ४२,००० कोटी रुपयांहून अधिक आहे; मात्र ही खाती संबंधितांच्या पॅन, मोबाइल क्रमांक, पत्ता आदींशी निगडित असल्याचेही प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.  प्रति खाते ५०,००० रुपयांवरील जमा रक्कम मात्र पॅन नमूद नसलेल्या बँक खात्यांविरुद्ध कारवाई सुरू असल्याचेही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

९ नोव्हेंबरनंतर बँकांत जमा झालेल्या जुन्या नोटांमधील रकमांचे विवरण

[jwplayer ncqbZxfX]