जगातील दोन वेगाने विकास साधत असलेल्या अर्थव्यवस्था म्हणून गणल्या गेलेल्या भारत आणि चीनमध्ये सर्वात भीषण आर्थिक विषमताही दिसून येते, अशा विरोधाभासावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने बोट ठेवले आहे.

आशिया-पॅसिफिक राष्ट्रगटांमध्ये भारत व चीन या देशांमध्ये गरिबीचे प्रमाण तीव्रतेने ओसरताना दिसत असले, तरी एकूण लोकसंख्येत कमालीची आर्थिक विषमता आहे, असे आयएमएफने म्हटले आहे. आर्थिक आघाडीवरील प्रभावी कामगिरीला येथे विषमतेच्या पातळीत वाढीची जोड लाभली आहे, असा आयएमएफच्या अहवालाचा शेरा आहे.

आशियामध्ये वेगवान वाढीचा गत कालावधी हा आर्थिक लाभांच्या समन्यायी वितरणांचा राहिला आहे. परंतु अलीकडे वेगाने वाढत असलेल्या या अर्थव्यवस्थांनी लक्षावधी दारिद्रय़ाच्या पाशातून मोकळे केले असले तरी, या समानतेने विकासाच्या पूर्वानुभवाची पुनरावृत्ती त्यांना करता आलेला नाही, असे हा अहवाल सांगतो. अहवालाच्या मते, भारतात ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील दरी वाढतेच आहे, शहरांतर्गत गरीब-श्रीमंत भेदही तीव्र बनत आहे. चीनमध्ये थायलंडप्रमाणेच शहरी मध्यमवर्गात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. तथापि भारत आणि इंडोनेशियात यापैकी मोठय़ा हिश्शाचे आणखी पुढे उच्च उत्पन्न गटाकडे संक्रमण लक्षणीय रूपात झालेले नसल्याचा अहवालाचा निष्कर्ष आहे. भारतात शहरी-ग्रामीण उत्पन्न पातळीत तफावत वाढत चालली आहे आणि शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागावरील महागाईचा अधिक जाच त्यात उत्तरोत्तर भर घालत आहे. गत दोन दशकांत शैक्षणिक क्षमता व कौशल्य विकासाच्या असमान संधीतूनदेखील विषमतेला खतपाणी घातले गेले आहे.