एका सामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीचे सर्वात मोठे स्वप्न हे घराचे असते आणि हे स्वप्न पाहण्याचे बळ त्याला बँका व वित्तसंस्थांकडून उपलब्ध होणाऱ्या गृहकर्जामुळेच येते; परंतु घरासाठी कर्ज मिळवायचे म्हणजे गृहवित्त कंपनीकडे अनेक प्रकारची कागदपत्रे जुळवून अर्ज सादर केल्यानंतरही अनेक दिव्ये पार पाडावी लागतात. कर्जदाराच्या सांपत्तिक व सांख्यिक स्थितीच्या अंदाजासाठी, प्रत्यक्ष कर्जमंजुरीआधी बँक अथवा वित्तसंस्थेला कर्जदाराची आमनेसामने मुलाखत घेणेही भाग पडते. बोलीभाषेत या भेटीला व्यक्तिगत संभाषण असे म्हटले जात असले तरी कर्जमंजुरीच्या दृष्टीने या मुलाखतीचा सार खूपच महत्त्वाचा असतो.
तुमच्या कर्जविषयक अर्जाला मंजुरी आणि मंजूर होणारी कर्जाची रक्कम या दोन्ही बाबी या व्यक्तिगत संभाषणावर अवलंबून असतात. यावरून या भेटीचे महत्त्व लक्षात घेऊन आवश्यक ती पूर्वतयारी करणे क्रमप्राप्तच आहे.

* एकूण उत्पन्नाचे निर्धारण:

कर्ज अर्जासोबत जोडलेली वेतन पावती आणि फॉर्म १६ सारख्या उत्पन्न दाखल्यातून तुमचे वार्षकि उत्पन्न कर्जदात्या संस्थेला ज्ञात असतेच, परंतु त्याव्यतिरिक्त मिळकतीचे काही अन्य स्रोत तुमच्याकडे आहेत काय, हे जाणणेही या संस्थेसाठी आवश्यक असते. तुमची कर्जफेडीची सक्षमता जाणून घेण्याच्या दृष्टीने ही बाब आवश्यकच असते. हे मिळकतीचे अन्य स्रोत म्हणजे लवकरच मुदतपूर्ती होत असलेल्या ठेवी अथवा अन्य गुंतवणुका, भविष्यात विकून धन जोडले जाऊ शकेल अशा मालमत्ता आणि तुम्ही सादर केलेल्या उत्पन्न दाखल्यात प्रतिबिंबित झालेले नाही असे तत्सम अन्य उत्पन्न हे मुलाखतकर्ता तुमच्याकडून जाणून घेईल.

* संपत्तीबाबत अंदाज:

कर्जदार वित्तसंस्था तुमच्या संपत्तीबाबत आणि भविष्यातील त्या संबंधाने नियोजनांबाबत काही नेमके प्रश्न मुद्दामहून विचारेल. काही अनावस्था प्रसंग ओढवल्याने तुमच्या नियमित उत्पन्नात खंड पडल्यास, तुमची परतफेड क्षमता चाचपण्याच्या दृष्टीने हे प्रश्न विचारले जातात.
* तुमच्या व्यवसायविषयक माहिती:
स्वयंरोजगार करणारे, व्यावसायिक यांचे उत्पन्न एकसारखे नसते, ते महिनागणिक वरखाली होत असते. त्यामुळे मुलाखतकर्ता तुमच्या पेशा-व्यवसायाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करेल. व्यवसायाचे हंगामी स्वरूप आणि आणीबाणीच्या प्रसंगासाठी तुमची सुसज्जता हा त्यांचा जिज्ञासेचा विषय असेल. यावरून तुमच्यासाठी नियमितपणे भरणे शक्य असलेल्या मासिक देय हप्त्याबाबत कर्जदार वित्तसंस्था अंदाज बांधून, गृहकर्जाची रक्कम निश्चित करतात.

* एकूण खर्चाचा निश्चित अंदाज

आपल्या प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी असते आणि परिणामी जगण्यासाठी येणारा खर्चही व्यक्तिसापेक्ष वेगवेगळा असतो. तुमची जीवनपद्धती नेमकी कशी आहे आणि उत्पन्नातून वजा होणाऱ्या घरखर्चाचा अंदाज बांधून कर्जदार संस्था दरमहा किती रकमेचा हप्ता तुम्हाला भरणे शक्य आहे हे तपासतात.

* अन्य कर्जदायित्व व जबाबदाऱ्या
तुमच्यावरील चालू स्थितीतील कर्जदायित्व, थकलेले क्रेडिट कार्डचे पेमेंट्स व अन्य जबाबदाऱ्या लक्षात घेणे गृहकर्ज देणाऱ्या संस्थेसाठी आवश्यकच ठरते. तुमच्यावरील एकूण कर्जाचा बोजा सुसहय़ पातळीवर आहे की नाही हे यातून तपासले जाते.

* भविष्यातील शक्यता:

तुमच्या नोकरी/पेशातील भविष्यातील संभाव्य प्रगतीचाही मुलाखकर्ता अंदाज घेतो. यातून तुम्हाला मंजूर करावयाच्या कर्जाची रक्कम आणि भविष्यात तुम्ही मासिक परतफेडीचा हप्ता वाढवून मोठा करू शकाल का, हे पाहून कर्जाचा कालावधीही निश्चित केला जातो. सामान्यपणे उभे राहणारे प्रश्न व त्यांचे समाधान या भेटीतून कर्जदार संस्था करतात. तुमचे इच्छित घराचे स्वप्न साकारण्यासाठी कर्ज मिळविताना या गोष्टी निश्चितच मदतकारक ठरतील.
(प्रस्तुत लेखक एडेल्वाइज हाऊसिंग फायनान्स लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

गृहकर्ज मिळविण्याची प्रक्रिया महत्त्वाच्या पायऱ्या
१. कर्जासाठी अर्ज
२. अधिकाऱ्यांशी व्यक्तिगत संभाषण
३. कर्जदार संस्थेकडून प्रत्यक्ष पाहणी
४. पत जोखीम मूल्यांकन व कर्ज मंजूरी
५. कर्जमंजूरी प्रस्ताव पत्र
६. कायदेशीर दस्तावेजांचे सादरीकरण व तपासणी
७. तांत्रिक/ मूल्याविषयक तपासणी
८. प्रत्यक्ष किंमत व कर्ज रकमेची निश्चिती
९. मालमत्ता दस्तांची नोंदणी (रजिस्ट्रेशन)
१०. तारण दस्तावर स्वाक्षऱ्या आणि पुढील तारखेच्या धनादेश जमा करणे
११. प्रत्यक्ष कर्ज वितरण

हे लक्षात घ्यायलाच हवे!
* प्रामाणिकता : जीवनातील अन्य कोणत्याही प्रसंगाप्रमाणे आमनेसामने संवादाच्या प्रसंगी आपण प्रामाणिकपणे उत्तरे देणे फायद्याचे ठरेल. तुम्ही कर्जासाठी अर्ज केलेल्या वित्तसंस्थेकडे तुमची उत्पन्नविषयक कागदपत्रे आधीच असतात, शिवाय तिला माहिती मिळवून देणारी अनेक संसाधने असतात. उद्योग व व्यापार क्षेत्रात संदर्भासाठी माहितीची खातरजमा करण्याचा प्रघात रूढ आहे. त्यामुळे तुम्ही केलेले कोणतेही असत्य कथन पकडले जाणे कठीण नाही हे ध्यानात घ्या. ते कितीही किरकोळ स्वरूपाचे असले तरी त्याचा तुमच्या कर्ज अर्जावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
* काहीही लपवून ठेवू नका: आधीच्या प्रामाणिकतेच्या सल्ल्याचे हे पुढचे पाऊल आहे. तुमच्यावरील कर्जदायित्व, तुमची बाजारातील पत, तुमच्या जीवनातील पडताळणी केली जाऊ शकेल अशा हरेक पलूची तुमच्याकडून झालेली वाच्यता तुमची गुणात्मकता वाढवणारी ठरेल. कर्ज मिळवायचे आहे म्हणून काही गोष्टी दडवून ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही. अर्थात खोडसाळ आणि गफलेबाज कर्जदारांबाबत बँका व वित्तसंस्थांमध्ये अलीकडे व्यवस्थित माहितीचे आदानप्रदान सुरू असते, हे लक्षात घ्या.
* सर्व दस्तऐवज तयार ठेवा: तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर गृहकर्जाची मंजुरीची प्रक्रिया जलद व्हावी यासाठी आमनेसामने भेटीत विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आणि त्यांची पुस्ती करणारी कागदपत्रे तुम्ही तयार ठेवणे आवश्यक ठरते.
* आत्मविश्वास: प्रत्यक्ष भेटीत तुम्ही घाबरून, गांगरून गेला आहात, असे दिसता कामा नये. बाजारात तुम्हाला हवे असलेले कर्ज देणाऱ्या अन्य संस्थाही आहेत, असा आत्मविश्वास तुमच्या बोलण्यातून दिसला पाहिजे, तुमची अवस्था याचकासारखी असल्याचे कदापिही दिसू नये.