रिझव्‍‌र्ह बँकेच्या वार्षिक अहवालात मावळत्या गव्हर्नरांचे संकेत

महागाईचा सध्याचा दर हा सहनशीलतेकरिता रिझव्‍‌र्ह बँकेने राखलेल्या ध्येयापलीकडे गेला आहे. यंदाच्या मान्सूनमुळे तो कमी होण्याची निश्चितच आशा आहे. मात्र जोपर्यंत महागाई दर कमी होत नाही तोपर्यंत व्याजदर कपात केली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे अल्पकालीन धोरण हे महागाईवर लक्ष केंद्रित करणारेच असेल, असे नमूद करीत त्यांनी नव्या गव्हर्नरांना स्थिर व्याजदराचे संकेतही यानिमित्ताने दिले आहेत.

येत्या ४ सप्टेंबर रोजी गव्हर्नरपदाची सूत्रे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्याकडे देणाऱ्या राजन यांनी व्याजदर कपातीबाबतचे हे संकेत मध्यवर्ती बँकेच्या २०१५-१६ च्या वार्षिक अहवालात दिले आहेत. गव्हर्नरपद कारकिर्दीतीले शेवटचे पतधोरण जाहीर करताना राजन यांनी वाढत्या महागाईचे निमित्त पुढे करीत स्थिर दर ठेवले होते.

जुलैमध्ये किरकोळ महागाई दर ६.०७ टक्के तर घाऊक महागाई दर ३.५५ टक्के नोंदला गेला आहे. हा दर गेल्या जवळपास दोन वर्षांतील सर्वोच्च टप्प्यावर आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीची मागणी उद्योगक्षेत्रातून होत आहे. मात्र राजन यांचे हे धोरण पटेल कायम ठेवतील, अशी आशा बँकप्रमुख, अर्थतज्ज्ञांना आहे.

वार्षिक अहवालात राजन म्हणतात, महागाईचा सध्याचा दर रिझव्‍‌र्ह बँक तसेच सरकारने निर्धारित केलेल्या ४ टक्क्यांपेक्षा खूपच पुढे आहे. त्यात जेव्हा कधी उतार दिसू लागेल तेव्हा रिझव्‍‌र्ह बँक व्याज दरही कमी करेल. विकासाबरोबर महागाईवर लक्ष केंद्रित करून समतोल साधणे रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्य असले पाहिजे. व्याजदर कधीही कमी करता येतील. मात्र त्यासाठी आधी महागाई दर खाली आला पाहिजे.

स्थिती आणि गरज

जुलैमध्ये किरकोळ महागाई दर ६.०७ टक्के तर घाऊक महागाई दर ३.५५ टक्के नोंदला गेला आहे. हा दर गेल्या जवळपास दोन वर्षांतील सर्वोच्च टप्प्यावर आहे.  अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीची मागणी  आहे.   राजन यांचे हे धोरण पटेल कायम ठेवतील, अशी आशा सर्वाना आहे.