नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारच्या निश्चलनीकरण मोहिमेत १३.३३ लाख बँक खात्यांवर प्राप्तिकर विभागाची करडी नजर आहे. ९.७२ लाख लोकांकडून या खात्यांमध्ये रद्दबातल ५०० व १,००० रुपये मूल्याच्या नोटांच्या रूपात  २.८९ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

निश्चलनीकरणादरम्यान चलनातून बाद करण्यात आलेल्या एकूण नोटांपैकी तब्बल ९९ टक्के बँकांमध्ये जमा करण्यात आल्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा वार्षिक अहवाल बुधवारी जाहीर झाला. जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटांतील मूल्य असलेल्या १५.४४ लाख कोटी रुपयांपैकी १५.२८ लाख कोटी रुपये बँक खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले होते. जुन्या १६,००० कोटी रुपये मूल्याच्या नोटा अद्यापही बँकांमध्ये जमा झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले.

बँकेत जमा झालेल्या मात्र प्राप्तिकर विभागाकडे असलेल्या माहितीशी सुसंगत नसलेल्या रकमेबाबत प्राप्तिकर विभाग तपास करीत असल्याचे कळते. बँकांमध्ये जमा झालेला सर्वच पैसा हा योग्य स्रोतांमधून जमा झालेला आहे, याबाबतची शंका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली होती. बँकांमधील जमा रकमेमुळे अधिक प्रमाणात बँक खातेदार कर जाळ्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता.

एक कोटी रुपयांवरील मालमत्ता रडारवर

प्रत्येकी एक कोटी रुपयांवरील सुमारे १४,००० मालमत्ताही प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येते. अशा मालमत्तांचे व्यवहार प्राप्तिकर विभागाकडे असलेल्या माहितीशी मेळ खात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काळा पैसा नष्ट करण्याच्या मोहिमेंतर्गत सरकारने १८ लाख संशयित व्यवहार निश्चित केले होते. त्यानंतर गेल्या महिन्याभरात तपासणी करण्यात आली. याबाबतच्या शोधमोहिमेचे प्रमाण निश्चलनीकरणानंतर तब्बल १५८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.