बडय़ा करचुकव्यांना अद्दल म्हणून त्यांची नावे सार्वजनिक करून त्यांची नालस्ती करण्याचे धोरण प्राप्तिकर विभागही अजमावून पाहणार आहे. बराच पाठपुरावा करूनही कर्जाची परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांबाबत बँकांकडून ही पद्धत यशस्वीरीत्या वापरात आली आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांचा कर थकविणाऱ्या १८ बडय़ा करचुकव्यांची पहिली सूची अशा तऱ्हेने पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आली आहे.

कर थकबाकीदारांची नावांसह वर्तमानपत्रात जाहिराती देऊन, कायद्याला न जुमानणाऱ्या या मंडळींपासून जनमानसाला सजग व सावध करण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रारंभी या करबुडव्यांची नावे प्रत्यक्षकर मंडळाच्या वेबस्थळावर जाहीर केली गेली, तर मंगळवारी राजधानी दिल्लीतील प्रमुख वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन प्राप्तिकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्तांकडून ही नावे त्यांच्या थकबाकीसह प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
नावे जाहीर करण्यात आलेल्या १८ करबुडव्यांपैकी ११ जण हे गुजरात राज्यातील आहेत. थकीत करांचा भरणा या मंडळींकडून केला जावा यासाठी अनेकवार पाठपुरावा करूनही काही साध्य होत नसल्याचे दिसल्यावर असे आक्रमक पाऊल टाकण्याचे कर प्रशासनाने ठरविले. १० कोटी रुपये आणि त्याहून अधिक कर थकबाकी असणाऱ्या मंडळींबाबत हाच प्रयोग देशात अन्यत्रही राबविण्यात येणार आहे. विशेषत: कर थकबाकीप्रकरणी प्रशासनाने धाडलेल्या नोटिसा अनुत्तरित परत येत असतील अथवा करदात्यांच्या दिलेल्या पत्त्यावर त्यांचा ठावठिकाणा नसल्यास, जाहिरातींद्वारे नालस्तीचा हा प्रयोग खूपच परिणामकारक ठरेल, असा अधिकाऱ्यांचा कयास आहे.