भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर व देशाचे अर्थमंत्री यांच्यातील मतभिन्नता पुन्हा समोर आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जगाच्या विकासाचे इंजिन म्हणून भारताला स्थान मिळणे अद्याप दूरचे असल्याचे मत व्यक्त करून दोन दिवस होत नाही तोच अर्थमंत्री अरुण जेटली यांना मात्र जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचे आज जे स्थान ते पटकावण्याची भारताला पूरेपूर संधी आहे असे वाटते.
बीबीसी या इंग्रजी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत राजन यांनी भारतासाठी हे स्थान तूर्त खूप लांबचे आहे, असे म्हटले होते. जेटली यांनी मात्र जगभरात भांडवली बाजार आणि चलनातील घसरण ही भारताच्या पथ्यावर पडणारी संधी असल्याचा याच वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केले.
वार्षिक ८ ते ९ टक्के विकास दर साधण्याची क्षमता भारतामध्ये असून तसे झाल्यास भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेत चीनची जागा घेऊ शकतो, असेही जेटली म्हणाले. व्यवसायासाठी देशाने यापूर्वीच लाल गालिचा अंथरला असून येथे मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक यावी, असे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. आर्थिक सुधारणा यापुढेही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.
जेटली म्हणाले की, जगाला इतरांनीही अर्थविकासाची प्रगती साधावी, असे वाटणे स्वाभाविक असून जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण असताना ८ ते ९ टक्के विकास दर साधू शकणाऱ्या भारताला याबाबत जागतिक स्तरावर पाठिंबा मिळणे क्रमप्राप्तच आहे. भारत हे एक गुंतवणूकप्रेमी ठिकाण असून करासारख्या पूर्वलक्ष्यी प्रभावाने कायदे लागू करण्याबाबत गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही अर्थमंत्र्यांनी केले.
सध्या मंदीच्या छायेत असलेल्या चीनला भारताने विकास दराबाबत मागे टाकले तरी त्यामुळे मोठा फरक पडणार नाही; सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत अमेरिका, चीन आणि भारत या अर्थव्यवस्थांमध्ये खूपच अंतर असल्याचे राजन मुलाखतीत म्हणाले होते.