आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था ‘स्टॅण्चार्ट’ला विश्वास
यंदा होणारा चांगला मान्सून आणि परिणामी ग्राहकांची वाढती क्रयशक्ती, सातव्या वेतन आयोगाचा लाभ या जोरावर भारताला चालू आर्थिक वर्षांत ७.४ टक्के विकास दर साधता येईल, असा विश्वास स्टॅण्डर्ड चार्टर्ड या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने व्यक्त केला आहे.
भारताची अर्थव्यवस्था २०१६-१७ मध्ये पूर्वपदावर येणार असून ग्रामीण भागातील मागणी वाढून खर्च तसेच गुंतवणुकीलाही चालना मिळेल, असेही वित्तसंस्थेने म्हटले आहे. जागतिक आर्थिक स्थिती बिकट वाटत असली तरी भारताला काळजी करण्याचे कारण नाही, असेही समर्थन करण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षांत भारताचा विकास दर ७.७ टक्के असेल, असे सिटीग्रुपने गेल्याच आठवडय़ात अंदाजित केले होते. आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेच्या अहवालात जागतिक स्तरावरील आर्थिक अस्थैर्य असले तरी भारतासाठी आशेचा किरण असल्याचे नमूद करण्यात आले होते.
तर इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने भारताचा आर्थिक विकासदर हा चालू वर्षांत आधी अंदाजलेल्या ७.९ टक्क्यांवरून ७.७ टक्के इतका राहील, असा खालावलेला सुधारित अंदाज ताज्या टिपणांतून काही दिवसांपूर्वीच पुढे आणला होता.
भारतीय अर्थव्यवस्थेला ७ ते ८ टक्के दराने सातत्यपूर्ण प्रगती करणे शक्य आहे, असा विश्वास मॉर्गन स्टॅन्ले, गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय दलाली पेढय़ांसह, संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात नुकताच व्यक्त केला होता.
भारताच्या अर्थवृद्धीबाबत दीर्घावधीत सकारात्मक कयास व्यक्त करताना, सध्यातरी मलूल जागतिक अर्थस्थितीत सहा ते सात टक्के दराने स्थिर रूपात अर्थगती साधण्याची धमक केवळ भारतात दिसून येते, असे गोल्डमन सॅक्सच्या संशोधन टिपणाने म्हटले होते.