व्हिएतनाम हा भारताचा अत्यंत महत्त्वाचा सहकारी आहे. या राष्ट्राशी असलेले आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याची भारताची मनीषा आहे, असे भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सांगितले. गुंतवणुकीसाठी दोन्ही देशांमध्ये उत्तमोत्तम संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. व्हिएतनामचे अध्यक्ष त्रुआँग तॅन सँग यांच्यासह त्यांनी सात विविध करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. ज्यामध्ये, तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी सहकार्य आणि दक्षिण चिनी समुद्रात ‘मुक्त संचारस्वातंत्र्या’च्या कराराचा समावेश आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी सध्या चार दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी व्हिएतनामचे अध्यक्ष सँग यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांतील सामरिक, राजकीय, व्यापारी आणि संरक्षणविषयक संबंधांना बळकटी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच उभय देशांच्या लोकांमधील संवाद वाढीस लागावा आणि आर्थिक क्षेत्रातही सहकार्य वृद्धिंगत व्हावे, यावर दोन्ही राष्ट्रप्रमुखांचे एकमत झाले.
चीनला काटशह
दक्षिण चिनी समुद्रातील मुक्त संचारस्वातंत्र्य करारावर उभय देशांच्या प्रमुखांनी संमतीची मोहोर उमटवली. दक्षिण चिनी समुद्रात सागरी मार्गिका, सागरी सुरक्षा, चाचेगिरीस विरोध आणि शोध व बचावकार्य या आघाडय़ांवर परस्परांना सहकार्य करण्यावर मुखर्जी आणि सँग यांच्यात एकमत झाले. भारताने व्हिएतनामशी केलेला हा करार चीनसाठी काटशह असल्याचे सामरिकतज्ज्ञांचे मत असून यामुळे चीन ‘उग्र प्रतिक्रिया’ व्यक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे म्हटले जात आहे.