विद्यमान आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी तर आगामी आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर ७.५ टक्क्यांवर राहण्याबाबत ठाम विश्वास व्यक्त करतानाच, आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ)ने जागतिक अर्थवृद्धीचा दर मात्र कमी करून २०१६ साठी ३.४ टक्क्यांवर सीमित राहण्याचे भाकीत वर्तविले आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेचा उत्तरोत्तर ऱ्हास सुरू असून, चालू आर्थिक वर्षांत तो ६.३ टक्के आणि २०१७ सालात तो आणखी घसरून जेमतेम ६ टक्के असेल, असा कयास आयएमएफने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या ‘जागतिक आर्थिक दृष्टिक्षेप’ या अहवालातून व्यक्त केला आहे. तथापि भारताकडून दमदार गतीने वाढीचा क्रम सुरू राहण्याबाबत अहवालाने भरवसा व्यक्त केला आहे. चिनी भांडवली बाजाराला आधीच तडाखा बसला आहे.

चीनकडून २५ वर्षांतील नीचांकी विकासदर

२०१५ मध्ये ६.९ टक्के विकास दर साधताना चीनने गेल्या २५ वर्षांतील तळ नोंदविला आहे. तर त्याचा या वर्षांतील शेवटच्या, चौथ्या तिमाहीतील ६.८ टक्के हा विकास दरही २००९ मधील जागतिक आर्थिक मंदीच्या कालावधी समकक्ष राहिला आहे. या देशाच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेला २०१५ मधील ६.९ टक्के दर हा १९९० मधील ३.८ टक्केनंतरचा किमान दर राहिला आहे. गेल्या वर्षांतील विकास दर ७ टक्के राहील, असा विश्वास सरकार पातळीवर व्यक्त करण्यात आला होता. मात्र तो यशस्वी ठरला आहे. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन आता १०.३ लाख कोटी डॉलर (म्हणजेच ६७.६७ लाख युआन) नोंदले गेले आहे. यामध्ये सेवा क्षेत्राचा ५०.५ टक्के हिस्सा आहे. आर्थिक साहाय्यतेची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.