जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या ‘इज ऑफ डुइंग बिझिनेस’ (उद्योगास अनुकूल स्थिती असलेले देश) या अहवालानुसार १८९ देशांच्या सूचीत भारताचा १४२वा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षीच्या १४०व्या स्थानावरून भारताची दोन पायऱ्यांनी घसरण झाली आहे.
उल्लेखनीय म्हणजे या अहवालाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे भारतात उद्योगास अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची दखल घेतलेली नाही. जागतिक बँकेच्या ग्लोबल इंडिकेटर्स ग्रुपचे संचालक ऑगस्टो लोपेझ-कालरेस यांनी सांगितले की, भारताच्या क्रमवारीचा संबंध आम्ही तेथील सध्याच्या राजकीय स्थितीशी जोडला असा समज निर्माण होऊ द्यायचा नव्हता. मोदी सरकारने अनेक उपाययोजना गुंतवणूक अनुकूलतेसाठी केल्या आहेत. उद्योगास अनुकूल वातावरण तयार करण्यात भारत आघाडीवर आहे, पण नवीन सरकार मे महिन्याच्या उत्तरार्धात सत्तेवर आले आणि आमची आकडेवारी ही ३१ मेपर्यंतची आहे. पुढील वर्षी मात्र सरकारच्या या उपाययोजनांमुळे भारत वरती सरकलेला दिसेल.
गेल्या वर्षी भारताला ५२.७८ गुण मिळाले होते, या वेळी ते ५३.९७ आहेत. गुण सुधारलेले असले तरी इतर देशांची कामगिरीही चांगली झाल्याने भारताचा क्रमांक मात्र घसरला आहे. सिंगापूरला ८८.२७ गुण मिळाले असून तो या सूचीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. त्यानंतर न्यूझीलंड, हाँगकाँग, डेन्मार्क, दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे. इतर प्रमुख देशांमध्ये अमेरिका आणि ब्रिटन अनुक्रमे सातव्या व आठव्या क्रमांकावर आहेत.
भारतापेक्षा या आघाडीवर सरस कामगिरी असणाऱ्या देशांमध्ये चीन (९०), श्रीलंका (९९), नेपाळ (१०८), मालदीव (११६), भूतान (१२५) व पाकिस्तान (१२८) याप्रमाणे क्रमवारी आहे.

भारताची महत्त्वाकांक्षा योग्यच: लोपेझ
भारत सरकारने या क्रमवारीत किमान ५०वा क्रमांक गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्याबाबत विचारले असता लोपेझ यांनी सांगितले की, का नाही.. अशी महत्त्वाकांक्षा बाळगण्यास काहीच हरकत नाही. अनेक देशांनी प्रयत्न करून, सुधारणा घडवून स्थिती सुधारली आहे. भारत काहीसा घसरला असला तरी तेथे गेल्या १२ महिन्यांत उद्योग करण्यास अनुकूल वातावरण निश्चितच होते.

कौशिक बसू यांचे भूमिकांतर!
जागतिक बँकेच्या या अहवालावर भारताच्या धोरणकर्त्यांकडून नेहमीच टीकेचे आसूड ओढले गेले आहेत. यंदाच्या वर्षांच्या अहवालाचे लेखन तर खुद्द भारताचे माजी अर्थ-सल्लागार राहिलेले कौशिक बसू यांनीच केले असून, भारताची उद्योग-व्यवसायास अनुकूलतेची स्थिती आणखी दोन पायऱ्यांनी घसरली आहे. गंमत म्हणजे सध्या जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ अशी भूमिका बजावत असलेले कौशिक बसू यांनीही ते भारताचे अर्थसल्लागार म्हणून कार्यरत असताना, त्यांनी जागतिक बँकेच्या अहवालाचा टीकात्मक समाचार घेतल्याची कबुली दिली आहे. या अहवालाच्या प्रस्तावनेत त्यांनी या कबुलीसह, ‘कधी काळी ज्या उत्पादनाचे आपण भोक्ते होतो त्याचाच निर्माता बनण्याची भूमिका बजावावी लागेल हे कल्पनेतही नव्हते,’ असे म्हटले आहे. देशाचे अर्थ सल्लागार म्हणून ऑगस्ट २०१२ मधील निवृत्तीनंतर, सप्टेंबर २०१२ पासून बसू यांची जागतिक बँकेत सध्याच्या पदावर नियुक्ती झाली आहे.