सलग सात महिने तेजी नोंदविल्यानंतर गेल्या महिन्यात देशाची निर्यात रोडावल्याने सरकारचे संपूर्ण विद्यमान आर्थिक वर्षांचे उद्दिष्ट धूसर बनले आहे. २०१३-१४ साठी ३२५ अब्ज डॉलरचे ध्येय राखणाऱ्या भारताची निर्यात ११ महिन्यांत अवघ्या २८२.७० अब्ज डॉलपर्यंतच पोहोचू शकली आहे. वित्त वर्ष संपण्याच्या शेवटच्या अवघ्या एका महिन्यात ४२.३ अब्ज डॉलर निर्यात होणे अशक्य मानले जात आहे.
गेल्या महिन्यात देशाची एकूण निर्यात ३.६७ टक्क्यांनी खाली येताना २५.६८ अब्ज डॉलर झाली आहे, तर एप्रिल २०१३ ते फेब्रुवारी २०१४ दरम्यान ती वार्षिक तुलनेत अवघ्या ४.७९ टक्क्यांनी उंचावली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१३ मध्ये भारताने तब्बल १३.४७ टक्के निर्यात वाढ नोंदविली आहे. जानेवारीपर्यंत त्यात एकेरी आकडय़ातील वाढ राखली जात होती.
निर्यातदार संघटनांच्या अंदाजाने, मार्चमध्ये उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यास निर्यात १६ ते १८ अब्ज डॉलरची कमतरता येऊ शकते. फेब्रुवारीमध्ये तेल, अभियांत्रिकी तसेच औषधनिर्मिती या निर्यात क्षेत्रातील महत्त्वाच्या क्षेत्राने नकारात्मक कामगिरी बजावल्याने एकूण निर्यात कमी झाली आहे. तर याच महिन्यात रत्ने व दागिन्यांची निर्यातही ४.१८ टक्के कमी होत ३.५९ अब्ज डॉलर झाली आहे.
गेल्या महिन्यात आयात ३३.८१ अब्ज डॉलर अशी १७.०९ टक्क्यांनी घसरल्याने व्यापार तूट ८.१३ अब्ज डॉलर राहिली आहे, तर तुटीवर सर्वाधिक भार असणारी तेल आयात ३.१ टक्क्यांनी कमी होत १३.६९ अब्ज डॉलर झाली आहे. सोने र्निबधाचाही लाभ तूट कमी होण्यावर झाला आहे.

उद्योगक्षेत्रातून चिंतेचा सूर
*  निर्यातीतील घसरण ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांसाठीचे एकूण निर्यात उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही याबाबत शंका आहे.
– सिद्धार्थ बिर्ला,
‘फिक्की’चे अध्यक्ष.

* निर्यातीचा सध्याचा वेग पाहता संपूर्ण आर्थिक वर्षांचे उद्दिष्ट पूर्ण होणे एकूणच कठीण आहे. स्थानिक निर्मिती क्षेत्रातील मंदीने निर्यातीवर परिणाम केला आहे.
– अनुपम शाह,
‘ईईपीसी’चे अध्यक्ष.

* निर्यातीत यंदा अपयश नोंदले गेले असले तरी आयात कमी झाली हेही उल्लेखनीय म्हणता येईल. मंदीसदृश स्थितीमुळे यंदा कमी निर्यात राखली गेली आहे.
– राणा कपूर,
‘असोचेम’चे अध्यक्ष.


सोने व चांदीची आयात वर्षभरापूर्वीच्या ५.७१ अब्ज डॉलरवरून यंदाच्या फेब्रुवारीत १.६३ अब्ज डॉलपर्यंत (७१.४२ टक्के) कमी झाली आहे. आर्थिक वर्षांतील पहिल्या ११ महिन्यांतील एकूण आयात ८.६५ टक्क्यांनी कमी होत ४१०.८६ अब्ज डॉलर झाली आहे. या कालावधीतील व्यापार तूट १२८ अब्ज डॉलर राहिली आहे.