देशातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील अव्वल बँका भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेने गुरुवारी चिनी आयात-निर्यात बँकेबरोबर (चायना एक्झिम बँक) पतसाहाय्यविषयक सामंजस्य करार केले. तर खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने तत्सम करार चायना डेव्हलपमेंट बँकेबरोबर केला.
स्टेट बँकेने १.८ अब्ज डॉलपर्यंत, तर आयसीआयसीआय बँकेने एक अब्ज डॉलपर्यंत पतपुरवठय़ाचे करार चीनच्या एक्झिम बँकेबरोबर केले असून, चीनमधून आयात करणाऱ्या भारतीय उद्योजकांना यातून उचित दराने आणि खात्रीचा कर्जपुरवठा शक्य होणार आहे. चीनमधून आयात होणारा कच्चा माल, ऊर्जा उपकरणे, यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक उत्पादने, उच्चतम व नवीन तंत्रज्ञान उत्पादने यांचे आयातदार तसेच विजेचे, पायाभूत तसेच बांधकाम प्रकल्पांचे प्रवर्तक हे या सामंजस्य कराराचे लाभार्थी ठरतील.
देशाच्या पायाभूत क्षेत्रात येत्या काही वर्षांत तीन लाख कोटी डॉलरची गुंतवणुकीची आवश्यकता असून दोन्ही बँकांत झालेल्या कराराचे त्यात लक्षणीय योगदान असेल, असे स्टेट बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. आयसीआयसीआय बँकेने यापूर्वी २००९ मध्ये चीनच्या एक्झिम बँकेबरोबर ५० कोटी डॉलरच्या पतपुरवठय़ाचा सामंजस्य करार केला होता.
चायना डेव्हलपमेंट बँकेने अ‍ॅक्सिस बँकेबरोबर केलेला सामंजस्य करार हा भारत-चीन दरम्यान व्यापार भागीदारी वेगाने विकसित होत असलेल्या आणखी मजबूत करण्यात आणि चिनी कंपन्यांशी व्यापार संबंध असलेल्या भारतातील उद्योजकांना अर्थसाहाय्य करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास अ‍ॅक्सिस बँकेने व्यक्त केला आहे. चीनच्या या बँकेने अशाच प्रकारचा करार आयसीआयसीआय बँकेशीही केला आहे. या दोन्ही खासगी बँकांच्या चीनमध्ये शाखाही आहेत.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडे उपलब्ध माहितीनुसार, चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार असून, उभयतांमधील व्यापार आर्थिक वर्ष २०१३-२०१४ मध्ये ६५.८६ अब्ज डॉलरच्या घरात गेला, तर जून २०१४ पर्यंतच्या तिमाहीत त्याने २२.४१ अब्ज डॉलरची मात्रा गाठली आहे. २०१५ पर्यंत दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार वार्षिक १०० अब्ज डॉलरचे प्रमाण गाठण्याच्या आशा व्यक्त केल्या जात आहेत.