फोर्ब्स आशिया फॅब्युलसच्या ५० कंपनी यादीत १० भारतीय कंपन्यांना स्थान मिळाले आहे. सर्वाधिक कंपन्या असलेल्या भारताने या क्रमात सलग पाचव्या वर्षी जागा राखली आहे.
फोर्ब्सने जारी केलेल्या आशियातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये ऑरबिंदो फार्मा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, एचडीएफसी बँक, ल्युपिन, मदरसन सुमी सिस्टिम्स, सन फार्मा, टाटा मोटर्स, टेक महिंद व टायटन यांचा समावेश आहे. एचडीएफसी बँकेने गेल्या दहा वर्षांत या यादीत नवव्यांदा स्थान राखले आहे. तर टाटा समूहातील तीन कंपन्यांचा या यादीत समावेश आहे. ३.२ कोटी ग्राहक आणि ४,००० शाखा असलेल्या एचडीएफसी बँकेचा विशेष उल्लेख ही यादी जारी करताना फोर्ब्सने केला आहे. भारतापेक्षा सर्वाधिक कंपन्या असलेल्या चीनचा क्रम फोर्ब्सच्या यादीत अग्रस्थानी आहे. चीनमधील २५ हून अधिक कंपन्या फोर्ब्सच्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये गणले गेल्या आहेत. चीन, भारत, दक्षिण कोरिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान या देशांचा उतरता क्रम कंपन्यांच्या संख्येबाबत यादीत आहे.
फॅब ५० मध्ये समाविष्ट करताना १,११६ कंपन्यांमधून निवड करण्यात आली. त्यासाठी वार्षिक ३ अब्ज डॉलर महसूल हा निकष होता.