२०१५-१६ मधील दर पंचवार्षिक उच्चांकावर

गेल्या आर्थिक वर्षांतील भारतीय अर्थव्यवस्थेचा ७.६ टक्के हा वेग पाच वर्षांतील वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. निर्मिती आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या जोरावर देशाने याबाबत चीनलाही मागे टाकले आहे, तर चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीतील दर हा ७.३ टक्के नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वीच्या ६.६ टक्क्यांपेक्षा तो यंदा सुधारला आहे. मात्र आधीच्या, दुसऱ्या तिमाहीतील ७.७ टक्क्यांच्या तुलनेत त्यात किरकोळ घसरण झाली आहे.

विकसनशील देश म्हणून ‘ब्रिक्स’मध्ये समावेश होत असलेल्या भारताव्यतिरिक्त चिनी अर्थव्यवस्था ६.९, रशियाची ३.७, ब्राझीलची ३.७ टक्के दराने प्रगती करत आहे.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर ७.६ टक्के नोंदला गेला आहे.

आधीच्या, २०१४-१५ मधील दरापेक्षा तो अधिक आहे. यापूर्वी देशाचा सर्वोच्च विकास दर २०१०-११ मध्ये ८.९ टक्के राखला गेला आहे. ताज्या अर्थप्रगतीबाबत केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी ही बाब सकारात्मक असल्याचे नमूद करत सरकारने गेल्या दीड वर्षांत राबविलेल्या सुधारणांचा हा परिणाम असल्याचे म्हटले आहे.

भारताचा विद्यमान विकास दर हा केंद्रीय अर्थ खाते, रिझव्‍‌र्ह बँक तसेच अन्य प्रमुख वित्तसंस्थांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे.

अर्थ खात्यांच्या मध्य वार्षिक अर्थ आढाव्यात चालू आर्थिक वर्षांकरिता अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ७ ते ७.५ टक्केअपेक्षित केला गेला आहे. तो रिझव्‍‌र्ह बँकेच्या ७.४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग चालू आर्थिक वर्षांत ७.३ टक्के तर आशियाई विकास बँकेने तो ७.४ टक्के राहील, असे यापूर्वीच नमूद केले आहे. तर मूडीच्या गुंतवणूूक सेवा विभागाने हा दर ७ टक्के असेल, असे म्हटले आहे.