केंद्रीय अर्थमंत्रालयाचा दावा
भांडवली बाजारातील गुरुवारच्या गटांगळीला जागतिक प्रतिकूलतेचे कारण पुढे करीत केंद्रीय अर्थ व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी बाह्य़ घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यास सरकार सिद्ध आहे, असा नि:संदिग्ध दावा केला.
जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण असताना चालू आर्थिक वर्षांत ७.६ टक्के वृद्धिदर राखणे उल्लेखनीय आणि महत्त्वाचे असल्याचे दास यांनी म्हटले आहे. गुरुवारची स्थानिक बाजारातील घसरणही जगभरातील अन्य भांडवली तसेच चलन बाजारातील घसरणीच्या पडसाद स्वरूपात आहे. भारतीय बाजार त्याला अपवाद ठरू शकत नाहीत. तथापि बाहेरील तीव्र पडझडींच्या तुलनेत आपला बाजार सुस्थितीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय सांख्यिकी संघटना-सीएसओने २०१५-१६ साठी ७.६ टक्के वृद्धिदर प्रस्तावित केला असून भारत तो दर राखण्यास समर्थ असल्याचे प्रतिबिंबित होत आहे. अनिश्चितता आणि दोलायमान स्थिती हा नवा नियम झाला आहे, सरकार आंतरराष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची सरकारची तयारी आहे, असेही दास म्हणाले.

तुलनेने बरी स्थिती
गुरुवारी स्थानिक बाजारात प्रमुख निर्देशांकांच्या सुमारे साडेतीन टक्क्य़ांच्या तीव्र घसरणीवर मतप्रदर्शन करताना, दास यांनी आपली स्थिती तुलनेने बरी असल्याचे प्रतिपादन केले. नववर्षांत जानेवारीपासून सेन्सेक्स व निफ्टी या भारतीय निर्देशांकात सुमारे १० टक्क्य़ांची घसरण झाली आहे. परंतु याच कालावधीत जपानच्या निक्केई निर्देशांक २१ टक्के, हाँग काँग निर्देशांक १४ टक्के, सिंगापूर १२ टक्के तर शांघाय निर्देशांक तब्बल २८ टक्के गडगडला आहे. अमेरिकी बाजाराचा एस अँड पी ५०० निर्देशांक १०.३५ टक्के घरंगळला आहे, अशी त्यांनी आकडेवारी पुढे केली.