बुधवारच्या भांडवली बाजारातील पडझडीत पुन्हा एकदा विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सिंहाचा वाटा राखला. पूर्वलक्ष प्रभावी किमान पर्यायी कर (मॅट) अनिश्चिततेपोटी एकटय़ा एप्रिल महिन्यात ९०० अंश घसरण नोंदविणाऱ्या सेन्सेक्समध्ये बुधवारी याच गुंतवणूकदारांनी वस्तू व सेवा कर सुधारणा अंमलबजावणीविषयी चिंता व्यक्त केली.

या गुंतवणूकदारांच्या कर चिंतेबरोबर बाजारातील अन्य किरकोळ गुंतवणूकदारांनी देशातील सेवा व निर्मिती क्षेत्रातील संथ वाढीबाबत साशंकता निर्माण केली. याचा एकत्रित परिणाम बाजारात मोठी आपटी नोंदविण्यात झाला.
अभिनेता सलमान खान प्रकरणात बुधवारी ठोठावण्यात आलेल्या शिक्षेने बाजारात मोठी संपत्ती राखणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गटानेही जोरदार विक्री अनुसरली. यामध्ये चित्रपट उद्योग, स्थावर मालमत्ता या क्षेत्रातील गुंतवणूकदार असण्याची शक्यता वर्तविली गेली.

गुंतवणूकदारांची रया ३ लाख कोटींनी गेली
चालू वर्षांतील दुसरी मोठी निर्देशांक आपटी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने त्याचा १०० लाख कोटी रुपयांचा टप्पाही बुधवारी सोडला. याचबरोबर गुंतवणूकदारांच्या २.८९ लाख कोटी रुपयांचे नुकसानही झाले. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांची मालमत्ता आता ९९.११ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे.

‘एमईपी’ची‘एन्ट्री’ चुकीच्या वेळी
पथकर व्यवस्थापन क्षेत्रातील एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सची भांडवली बाजारातील सूचिबद्धता बुधवारच्या मोठय़ा घसरणीच्या वातावरणातच झाली. कंपनीने जारी केलेल्या ६३ रुपये मूल्यापेक्षा समभाग ७ टक्के खालच्या मूल्यावर प्रवास करत होता. व्यवहारात तो ६३.५० पर्यंतच पोहोचू शकला. अखेर ३.२५ टक्के कमी, ६०.९५ रुपयांवर तो स्थिरावला. गेल्या महिन्यात समभाग जारी करणाऱ्या कंपनीच्या भागविक्री प्रक्रियेला १.१० पट प्रतिसाद लाभला होता. ६३ ते ६५ रुपये किंमतपट्टा निश्चित करताना ३२४ कोटी रुपयांची उभारणी कंपनीने केली होती. एमईपीद्वारे १२ राज्यांमध्ये १२२ पथकर केंद्राची हाताळणी होते.

रुपयाही तळात
डॉलरच्या तुलनेत सलग चौथ्या दिवशी कमकुवत कामगिरी पार पाडणारा रुपया बुधवारी १० पैशांनी आपटत ६३.५४ या गेल्या आठवडाभराच्या तळात विसावला.