रिझव्‍‌र्ह बँकेने अर्थव्यवस्थेबाबत तर वेधशाळेने मान्सूनबाबत व्यक्त केलेल्या चिंतेने भांडवली बाजाराला घेरले आणि मंगळवारी त्यातून मोठय़ा घसरणीचे प्रत्यंतर दिसून आले. द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रिझव्‍‌र्ह बँकेने तमाम कर्जदारांना दिलेली व्याजदर कपातीची खूशखबरही या भीतीपायी गुंतवणूकदारांनी अव्हेरली.
सेन्सेक्सने गेल्या दोन दिवसांत केलेली कमाई अवघ्या एका दिवसात दुपटीने वाया गेली. ६६०.६१ अंश आपटीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७,१८८.३८ वर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये १९६.९५ अंशांची झीज होऊन तो ८,२३६.४५ पर्यंत घसरला.
देशांतर्गत अर्थव्यवस्थेची गती तूर्त स्थिर राहण्याची शक्यता वर्तवितानाच कृषी क्षेत्राकडून निराशा होऊ शकते, अशी शंका गव्हर्नरांनी पावसाबाबत अनिश्चिततेतून व्यक्त केली. महागाईबाबत अंदाज उंचावतानाच त्यावरील नियंत्रणासाठी अन्नधान्य पुरवठा व्यवस्थापनाची गरजही त्यांनी व्यक्त केली. मार्चमधील बिनमोसमी पावसाचा उल्लेखही आपल्या पतधोरणात डॉ. राजन यांनी केला. बरोबरीने वेधशाळेनेही यंदा तुटीच्या मान्सूनचा आणि दुष्काळाकडे संकेत करणारा सुधारीतअंदाज जाहीर केला. त्याचेही विपरीत पडसाद बाजारात उमटले. रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या पाव टक्का दर कपातीकडे त्यामुळे एकूणच बाजाराचे दुर्लक्ष झाले. आधीच संथ अर्थव्यवस्था आणि त्यात महागाईची चिंता अशा वातावरणात दिवसभर बाजारातील व्यवहार राहिले.
सेन्सेक्सचा व्यवहारातील २७,९०२.५३ हा उच्चांक सत्राच्या सुरुवातीलाच होता. तर २७,१४६.६८ हा तळ त्याने दिवसभरात गाठला. दोन्ही निर्देशांकातील सत्रातील आपटी ही दोन टक्क्यांहून अधिक होती. निर्देशांकांची यापूर्वीची सत्रातील मोठी आपटी ही ६ मे रोजी होती. बाजारात मंगळवारी डॉलरच्या तुलनेत ६४ पर्यंत घसरू पाहणाऱ्या रुपयानेही चिंतेत सहभाग नोंदविला.
अर्धशतकी निर्देशांक वाढीने मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवात करणारा सेन्सेक्स रिझव्‍‌र्ह बँकेच्या पाव टक्का दर कपातीनंतर थेट ४०० अंशांनी कोसळला. निर्देशांक या वेळी २७,५०० वर येऊन ठेपला. तर निफ्टीनेही याच वेळी शतकी आपटीसह ८,४०० चा स्तर सोडला. दुष्काळसदृश्यतेच्या वेधशाळेच्या अंदाजाने या पडझडीत आणखी भर घातली.

२.२६ लाख कोटींची मत्ता-हानी
एकाच व्यवहारात महिन्यातील सर्वात मोठी आपटी नोंदविणाऱ्या शेअर बाजारात मंगळवारी गुंतवणूकदारांची मत्ता २.२६ लाख कोटी रुपयांनी रोडावली. मुंबई निर्देशांकाच्या ६६१ अंश आपटीने बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्यात इतके प्रचंड नुकसान दिसून आले.

व्याजदरसंलग्न समभाग अस्वस्थ
रिझव्‍‌र्ह बँकेने पाव टक्का दर कपात करूनही व्याजदराशी निगडित समभागांमध्ये मंगळवारी तब्बल ८ टक्क्यांपर्यंतची आपटी नोंदविली गेली. नजीकच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेचा अंदाज घेत आगामी कालावधीत गव्हर्नरांनी आणखी व्याजदर कपात करण्याबाबत साशंकता व्यक्त केल्याने स्थावर मालमत्ता, सरकारी तसेच खासगी बँका, वाहन क्षेत्रातील समभागांवर विपरीत परिणाम दिसून आला.