अर्थव्यवस्थेला लाभलेल्या गतीशीलतेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जगातील ५० अग्रेसर अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत पिछाडीवर पडला आहे. या यादीत ४० व्या स्थानावर फेकले गेल्याने भारताची अर्थव्यवस्था ‘गतीमंद’ ठरली आहे. ग्रॅँट थॉर्टन या आर्थिक क्षेत्रातील नामांकित कंपनीने ही यादी तयार केली असून सिंगापूरने जगातील सर्वाधिक गतीमान – चैतन्यशील अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे.
ग्रॅँट थॉर्टनने यासाठी जागतिक चैतन्यशीलता निर्देशांक तयार केला आहे. या निर्देशांकानुसार भारत ४० व्या स्थानी असून हा निर्देशांक २२ गतीमानतेच्या विविध निकषांवर तयार करण्यात आला आहे. या क्रमवारीबरोबरच, उद्योजकतेला पोषक वातावरण, अर्थव्यवस्था आणि वृद्धी, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राला असलेली गतीमानता, कामगार-मनुष्यबळाची उपलब्धता आणि वित्तपुरवठय़ासाठी पोषक वातावरणाची उपलब्धता या पाच संवर्गांची स्वतंत्र क्रमवारीही जाहीर करण्यात आली. मात्र या क्रमवारीतही भारताच्या पदरी निराशाच पडली आहे.
‘उद्योजकतेला पोषक वातावरण’ या आघाडीवर भारताला ५०राष्ट्रांच्या यादीत ४६ वा क्रमांक मिळाला असून वित्तपुरवठय़ास अनुकुल वातावरण निर्मितीत भारत ४३ व्या स्थानी आहे. मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत भारत ३३ व्या स्थानी आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रास चालना देण्याबाबत ३७ व्या स्थानी आहे. गतीमान अर्थव्यवस्थांमध्ये सिंगापूर पाठोपाठ फिनलँड, स्वीडन, इस्राईल, ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलियाने स्थान मिळवले आहे. या यादीत अमेरिका दहाव्या क्रमांकावर आहे. या सर्व नकारात्मक पाश्र्वभूमीवर भारताने अर्थव्यवस्था आणि वृद्धी या संवर्गात मात्र पाचवे स्थान मिळवले आहे तर भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या चीनने या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. जागतिक अर्थव्यवस्था आता सावरू लागली असून भारतीय अर्थव्यवस्था तिचे आकारमान आणि विकासदर यामुळे, जागतिक अर्थव्यस्थेला सुदृढ करण्याच्या कामी आगामी काळात ती महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आशावाद ग्रॅँट थॉर्टनचे विशेष चंडिओक यांनी व्यक्त केला.