विदेशी गुंतवणूकदारांवरील कोटय़वधी रुपयांचा कर हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या सरकारच्या हालचालींनी सप्ताहारंभीच भांडवली बाजारात निर्देशांकांची खळबळ उडाली. सेन्सेक्स आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सत्रात तब्बल ५०० हून अधिक अंशांने रोडावत थेट २८ हजाराच्याही खाली आला. तर निफ्टीने दिडशेहून अधिक अंश आपटी राखत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाला ८,५०० चा स्तर सोडण्यास भाग पाडले.

मुंबई निर्देशांक ५५५.८९ अंश घसरणीसह २७,८८६.२१ वर तर निफ्टी १५७.९० अंश नुकसानासह ८,४४८.१० वर येऊन थांबला. भांडवली बाजार आता गेल्या तीन आठवडय़ाच्या तळात येऊन विसावला आहे.
सलग चौथ्या व्यवहारात प्रमुख निर्देशांक आपटले आहेत. सेन्सेक्सची घसरण तर आठवडय़ाभरात तब्बल १,१६० अंश राहिली आहे. गेल्या सोमवारी २९ हजाराचा टप्पा सोडणाऱ्या मुंबई निर्देशांकाने सोमवारच्या मोठय़ा आपटीने आता २८ हजाराचा स्तरही सोडला आहे.
सूचिबद्ध कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांबाबत गेल्या आठवडय़ापासून बाजारात चिंता व्यक्त केली जात होती. त्याचाच परिणाम म्हणून गेली दोन ते तीन सत्र बाजार नकारात्मक स्थितीत प्रवास करत होता.
नव्या सप्ताहाची सुरुवात करताना बाजाराच्या निराशेला वेगळेच निमित्त मिळाले. विदेशी गुंतवणूकदारांवरील देय कर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची सरकार पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. भांडवली बाजाराच्या तेजीत सिंहाचा वाटा राखणाऱ्या हा गट यापूर्वीच ४० हजार कोटी रुपयांच्या कर तगाद्याने त्रस्त आहे. याबाबत या गुंतवणूकदारांना न्यायालयाचे दरवाजे उघडे असल्याचे महसूल सचिवांनी सूचित करत कर वसुलीबाबत ठामपणा व्यक्त केला होता.
त्याचबरोबर मार्च आणि मार्च २०१५ अखेर घसरलेली निर्यात व्यवहारात रुपयातील ६३ पर्यंतची घसरण हेही भांडवली बाजाराला खाली खेचण्यास निमित्तमात्र ठरले. आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांकाच्या नकारात्मक प्रवासाचे सावटही स्थानिक भांडवली बाजारावर उमटले.
नव्या आठवडय़ाची सुरुवात ९५ अंश वाढीने करणारा सेन्सेक्स सुरुवातीला नफेखोरी व नंतर चिंतेने २८ हजाराचा स्तर सोडत व्यवहारात २७,८०२.३७ या नीचांकापर्यंत येऊन ठेपला. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाचीही जवळपास २ टक्क्य़ांची आपटी सोमवारी नोंदली गेली.
मुंबईच्या शेअर बाजार दफ्तरी रिलायन्स, इन्फोसिस, एनएमडीसी या आघाडीच्या समभागांमध्येही मोठी घसरण नोंदली गेली. सेन्सेक्स व निफ्टीमध्ये सेन्सेक्स ४.४६ टक्क्य़ांसह दोन्ही निर्देशांकांच्या सूचीत घसरणीत अन्य कंपन्यांच्या तुलनेत सर्वप्रथम राहिला. कंपनीने शुक्रवारच्या भांडवली बाजारातील व्यवहारानंतर चौथ्या तिमाही निकालात अवघ्या ८.५ टक्क्य़ांची वाढ नोंदविली होती.
सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २८ समभागांचे मूल्य रोडावले. सन फार्मा व आयसीआयसीआय बँक हे केवळ दोनच समभाग मुंबई निर्देशांक घसरणीत राहूनही तेजीत राहिले. हीरो मोटोकॉर्प, सिप्ला, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, अ‍ॅक्सिस बंक, आयटीसी, एचडीएफसी, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, ओएनजीसी असे जवळपास सारे समभाग घसरणीत आले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक फटका माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाला २.०६ टक्क्य़ांसह बसला. यामध्ये इन्फोसिस, टीसीएस, विप्रो यांच्या समभाग मूल्यांतील आपटी २.२३ टक्क्य़ांपर्यंतची होती.
त्याचबरोबर स्थावर मालमत्ता २.८८, भांडवली वस्तू २.१७ टक्के, ऊर्जा २.०४ व तेल व वायू निर्देशांक १.९१ टक्क्य़ांसह घसरले होते. स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही अनुक्रमे २.१७ व २.०२ टक्क्य़ांनी खाली आले.

..तरीही रिलायन्सची आपटी
जवळपास दोन टक्के निर्देशांक घसरणीच्या भांडवली बाजारात रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभाग सोमवारी सेन्सेक्स तसेच निफ्टी दफ्तरी आघाडीवर राहिला. दोन्ही व्यासपीठावर कंपनीच्या समभागाचे मूल्य एकाच व्यवहारात तब्बल ४ टक्क्य़ांनी रोडावले. परिणामी कंपनीचे बाजार मूल्यही सोमवारच्या सत्रात १३,२८२ कोटी रुपयांनी खाली आले. कंपनीने गेल्या सात वर्षांतील सर्वोत्तम तिमाही वित्तीय निष्कर्ष नोंदविल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री करत नफेखोरी अवलंबिल्याचे मानले जाते. मुंंबई शेअर बाजारात रिलायन्सचा समभाग व्यवहारात ५.१८ टक्क्य़ांपर्यंत घसरल्यानंतर दिवसअखेर ४.४६ टक्के घसरणीसह ८८५.५५ रुपयांवर स्थिरावला. तर निफ्टीत तो ४.४ टक्के आपटीसह जवळपास याच टप्प्यावर राहिला. सोमवारच्या नुकसानामुळे रिलायन्सचे बाजार भांडवल २,८६,५५९.९४ कोटी रुपयांवर आले.

यूबीएसचा आशावाद मावळला
भांडवली बाजारातील गेल्या वर्षभरातील तेजीचे चित्र हे प्रामुख्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होणे यावर आधारित होते, असे नमूद करत यूबीएसने, मात्र अनेक कंपन्यांचे गेल्या तिमाही व एकूण आर्थिक वर्षांचे निकाल निराश करत असल्याचे नमूद केले आहे. निफ्टीचा सोमवारचा ८,६१९.९५ ते ८,४२२.७५ प्रवास पाहून यूबीएसनेही डिसेंबर २०१५ पर्यंत राष्ट्रीय शेअर बाजाराचे लक्ष्य ९,२०० ते ९,६०० पर्यंतच नेले आहे. आम्ही केलेला बाजाराचा ताजा अंदाज हा अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक संथ प्रवास करणार असल्याने व्यक्त करण्यात आला आहे, असेही वित्तसंस्थेने स्पष्ट केले आहे.

रुपयाचीही धास्ती
मुंबई : भांडवली बाजारात मोठी आपटी नोंदली गेली असतानाच परकी चलन व्यवहारात रुपयानेही सोमवारी धास्ती निर्माण केली. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन सत्रात ६३ पर्यंत घसरले. दिवसअखेर सप्ताहारंभी अखेर रुपया ५५ पैशांनी रोडावत ६२.९१ पर्यंत स्थिरावला. चलनाचा हा गेल्या महिन्याभरातील तळ होता. भांडवली बाजारातून प्रामुख्याने विदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी काढता पाय घेतल्याने अमेरिकी चलनाला मोठय़ा प्रमाणात मागणी आली. व्यवहारात रुपया ६२.४७ पर्यंतच भक्कम होऊ शकला. तर त्याचा दिवसाचा तळ ६३ नजीक, ६२.९३ राहिला. चलनाचा यापूर्वीचा सत्रातील सुमार प्रवास १३ मार्च रोजी ६२.९७ असा राहिला आहे.

सराफा बाजार संमिश्र
मुंबई : भांडवली व परकी चलन व्यवहारात आपटीचे सत्र सुरू असताना मुंबईच्या सराफा बाजारात सोमवारी संमिश्र वातावरण पहायला मिळाले. सोने दरात किरकोळ वाढ तर चांदीचे भाव काही प्रमाणात खाली आले. स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्याचा दर सोमवारी ५० रुपयांनी भक्कम होत २६,७४० रुपयांवर गेला. तर किलोसाठी चांदीचा भाव सप्ताहारंभीच्या पहिल्याच दिवशी ६० रुपयांनी नरम होत ३७,१५० रुपयांवर आला. मंगळवारी मौल्यवान धातू खरेदीचा एक मुहूर्त, अक्षय तृतिया असूनही या बाजारात संमिश्र हालचाली नोंदल्या गेल्या.