पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यरोहणानंतर आर्थिक आघाडीवरील या सरकारच्या कामगिरीचा पहिल्या कसोटीचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला आला आहे. जुलै ते सप्टेंबर २०१४ तिमाहीतील स्थूल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर हा ५.३ टक्के राहिल्याचे शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले.
गेल्या वर्षांतील याच तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा ५.२ टक्के होता, त्या तुलनेत यंदा तो ५.३ टक्के असा सुधारला असला तरी आधीच्या म्हणजे एप्रिल-जून २०१४ तिमाहीतील ५.७ टक्क्यांच्या तुलनेत तो मंदावला असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट होते. तथापि अर्थविश्लेषकांनी सप्टेंबर तिमाहीअखेर e02विकासदर हा ५.१ टक्क्यांवर घसरण्याच्या व्यक्त केलेल्या कयासापेक्षा प्रत्यक्षात आलेले आकडे मात्र सरस आहेत.
दुसऱ्या तिमाहीतील हे आकडे जमेस धरल्यास, एप्रिल ते सप्टेंबर या अर्धवार्षिकाचा आर्थिक विकास दर ५.५ टक्के असा होतो, जो एप्रिल-सप्टेंबर २०१३ या सहामाहीतील ४.९ टक्क्यांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. प्रामुख्याने जवळपास थंडावलेल्या खाणकाम क्षेत्राने दाखविलेला १.९ टक्क्यांचा वेग, वीजनिर्मिती आणि सेवा क्षेत्रातील वाढीने विकासदरात वाढीस हातभार लावला. गेल्या वर्षी एप्रिल-सप्टेंबर सहामाहीत खाणकाम क्षेत्र वाढीऐवजी उणे दोन टक्क्यांचा संकोच दर्शविला होता.  
वीज, वायू आणि जलपुरवठा क्षेत्राने मात्र दमदार ८.७ टक्क्यांची तिमाही वाढ दाखविली. सहामाहीचा विचार करता या क्षेत्राची वाढ ९.५ टक्क्यांची आहे. सेवा क्षेत्रानेही तिमाही ९.६ टक्के दराने प्रगती सुरू ठेवल्याचे दिसून आले. विकास दर वाढीत यांचे भरीव योगदान राहिले.

निर्माण क्षेत्राचा गतीरोध चिंताजनकच!
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत निर्माण क्षेत्राने अपेक्षेप्रमाणे गती पकडली नसल्याचे ताज्या आकडय़ांमधून स्पष्ट होते. सरलेल्या तिमाहीत निर्माण क्षेत्राने अवघी ०.१ टक्क्यांची वाढ दाखविली, गेल्या वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण १.३ टक्के असे होते. त्याचप्रमाणे शेती, वन (बागायती) आणि मत्स्यशेती असे एकूण कृषी क्षेत्राची सरलेल्या तिमाहीत ३.२ टक्क्यांनी गती मंदावली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत या क्षेत्राने ५ टक्के दराने प्रगती केली होती.