कमी आयातीसह आणि निर्यातीने गेल्या सात महिन्यांत दुहेरी आकडय़ातील वाढीची कामगिरी बजाविताना मेमधील व्यापार तूट ही गेल्या तब्बल १० महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. आयात-निर्यातेतील दरी म्हणून गणली जाणारी तूट मेमध्ये ११.२३ अब्ज डॉलर झाली आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या महिन्यात आयात ११.४ टक्क्यांनी घसरून ३९.२३ अब्ज डॉलर झाली आहे. तर मेमधील भारताची निर्यात १२.४ टक्के वाढताना गेल्या सहा महिन्यांतील सवरेत्कृष्ट कामगिरी करती झाली आहे. असे असले तरी व्यापार तूट वर्षभरापूर्वीच्या, मे २०१३ च्या १९.३७ अब्ज डॉलरपेक्षा यंदा कमीच राहिली आहे. तर दहा महिन्यांपूर्वी, जुलै २०१३ मध्ये १२.२ अब्ज डॉलर यापूर्वीची सर्वात मोठी तूट नोंदली गेली आहे.
गेल्या सात महिन्यांत प्रथमच दुहेरी आकडय़ातील वाढ राखणाऱ्या निर्यातीने १० महिन्यांच्या उच्चांकाला गाठले आहे. अभियांत्रिकी, पेट्रोलियम उत्पादने आणि वस्त्र या क्षेत्रांनी निर्यातीला यंदा प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे मेमध्ये एकूण निर्यात तीन अब्ज डॉलरने वाढून २८ अब्ज डॉलर झाली आहे. तर आयातीमध्ये सोने आयात ७२ टक्क्यांनी घसरून २.१९ अब्ज डॉलर झाली आहे. तेल आयात २.५ टक्क्यांनी कमी होत मेमध्ये १४.४६ अब्ज डॉलपर्यंत आली आहे. बिगर तेल आयात चालू आर्थिक वर्षांत दुसऱ्यांदा कमी झाली आहे.
चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या दोन महिन्यांत निर्यात ८.८७ टक्क्यांनी उंचावत ५३.६३ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. तर एप्रिल-मे २०१४ दरम्यान आयात १३.१६ टक्क्यांनी कमी होत ७४.९५ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. यामुळे या कालावधीतील व्यापार तूट २१.३ अब्ज डॉलर राहिली आहे.
निर्यातवाढीचे सुचिन्ह खरोखरच उत्साहवर्धक आहे. सहा महिन्यांत प्रथमच यंदाच्या मेमध्ये निर्यात वधारली आहे. दुहेरी आकडय़ातील ही वाढ आहे. अर्थव्यवस्था सावरत असल्याचेच हे लक्षण आहे. निर्यातीत वस्तू या त्यांच्या नैसर्गिक मागणी स्तरावर पोहोचू पाहत आहेत.
– राजीव खेर,  केंद्रीय वाणिज्य सचिव