स्थानिक बाजारपेठेसाठी चालू आर्थिक वर्षांत किमान २५ नवीन औषधे तयार करण्याच्या तयारीत असणाऱ्या इंडोको रेमिडिजने आंतरराष्ट्रीय विक्रीसाठी १० औषधांकरिता अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करण्याचे निश्चित केले आहे. पैकी पहिल्या तिमाहीत तीन औषधांसाठी अर्जही करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय औषध विक्री व्यवसायातील चढता कल कायम राहण्यासाठी कंपनी या नव्या औषधांच्या निर्मितीसाठी सज्ज आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेसाठी किमान २५ नवीन औषधे सादर करण्याच्या मन:स्थितीत कंपनी आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीत ७ औषधे सादरही केली आहेत.
कंपनीच्या गोव्यातील दोन केंद्रांना नुकतेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे.
जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात तब्बल ११८ टक्के वाढ नोंदवितानाच १९८ कोटी रुपयांच्या माध्यमातून उलाढालीचा उच्चांक गाठला आहे.
इंडोको रेमिडिजच्या या यशाचे अवलोकन करताना कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक अदिती कारे- पाणंदीकर यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारा व्यवसाय आणि भारतीय बाजारपेठेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर हा टप्पा गाठता आला आहे. औषध निर्माण क्षेत्राची स्थानिक ८.८ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत कंपनीचा दर २४.४ टक्के राहिल्याचेही त्या म्हणाल्या.
कंपनीच्या नुकत्याच झालेल्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इंडोको रेमिडिजचे अध्यक्ष सुरेश कारे यांनी, कंपनी गोव्यातील संशोधन केंद्र विस्तारासाठीच्या जमीन संपादनाच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात असल्याचे जाहीर केले. कंपनीच्या नवी मुंबईतील रबाळे येथेही एक लाख चौरस फूट जागेव्यतिरिक्त संशोधन केंद्रासाठी २० हजार चौरस फूट जागा ठेवणार आहे.