महागाई भयंकर दुहेरी आकडय़ानजीक
केंद्रातील मनमोहनसिंग सरकारने सप्टेंबरमध्ये पल्लवीत केलेल्या अर्थ-आशा ऐन दिवाळीत मावळल्या आहेत. दीपावलीच्या मुहूर्तावर आर्थिक आघाडीवर काहीसा काळोख दाटून आल्याचे संकेत मिळाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादनात घट झाली असून निर्यातही कमालीची रोडावली आहे. किरकोळ क्षेत्रातील महागाईही भयंकर दोन अंकी वाढली आहे. स्पेक्ट्रम लिलावाला थंडा प्रतिसाद मिळाला असून दूरसंचार कंपन्यांनी पाठ फिरवल्याने आता सरकारला अपेक्षित महसुलाच्या आशेलाही कांडी लागली आहे.
देशातील उद्योगधंद्याच्या हालहवालाचा सूचक असणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक सप्टेंबरमध्ये अवघ्या ०.४ टक्के नोंदला गेला असून, देशाच्या आर्थिक प्रगतीची चाकेही कमालीची मंदावल्याचे हे द्योतक आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे सप्टेंबर २०११ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा विकासदर २.५ टक्के होता. तर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अर्धवार्षिकातही आधीच्या तब्बल ५.१ टक्क्यांवरून तो थेट १ टक्क्यांवर घसरला आहे. याच वेळी ऑगस्ट महिन्याचा औद्योगिक उत्पादन दर सुधारण्यात आला असून तो पूर्वी जाहीर केलेल्या २.७ टक्क्यांपेक्षा आणखी कमी, २.३ टक्के झाला आहे.
एकूण औद्योगिक उत्पादनात ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ सप्टेंबरमध्ये अवघी १.५ टक्के झाली आहे. वर्षभरापूर्वी ती ३.१ टक्के होती. तर भांडवली वस्तू निर्मिती सप्टेंबर २०११ मध्ये १२.२ टक्के दराच्या तुलनेत यंदा ६.५ टक्क्यांवर अशी निम्म्यावर आली आहे.
देशातील ऑक्टोबरमधील निर्यात १.६३ टक्क्यांनी घसरली असून आयात मात्र तब्बल ७.३७ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे व्यापारी तूट इतिहासात प्रथमच २१ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये एकूण २३.२ अब्ज डॉलर निर्यात झाली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ही  निर्यात ११ टक्क्यांनी कमी झाली आहे.  त्या उलट ऑक्टोबरमध्ये ४४.२ अब्ज डॉलरच्या आयातीची नोंद ही गेल्या दीड वर्षांतील सर्वात मोठी आयात आहे. तत्पूर्वी सर्वाधिक आयात मे २०११ मध्ये ४५.२ अब्ज डॉलपर्यंत गेली होती. यामुळे यंदा व्यापारी तूटही २०.९६ अब्ज डॉलर झाली आहे. जागतिक स्थितीमुळे यंदाची व्यापारी तूट ही चिंताजनक असली तरी ऑक्टोबरमधील निर्यात काही प्रमाणात सुधारली असल्याचा दावा वाणिज्य सचिव एस. आर. राव यांनी केला आहे.
महागाईचा फणा ऐन दिवाळीतही कायम राहिला आहे. ऑक्टोबरमध्ये तर ग्राहक वस्तू निर्देशांकांवर आधारीत महागाई दर भयंकर दोन्ही अंकी पातळीच्या काठावर म्हणजे ९.७५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. साखर, डाळी, भाज्या त्याचबरोबर वस्त्र, पादत्राणे या ऐन सणांमध्ये खरेदी होणाऱ्या वस्तूही गेल्या महिन्यात महाग झाल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये साखरेच्या किंमती १९.६१ टक्क्यांनी, खाद्यतेले १७.९२ टक्क्यांनी, डाळी १४.८९ टक्क्यांनी, भाज्या १०.७४ टक्क्यांनी तर मासांहारी पदार्थही १२.१८ टक्क्यांनी वधारले आहेत. वस्त्र, पादत्राणे या सारख्या वस्तूही दुहेरी आकडय़ाने म्हणजे १०.४७ टक्के महाग झाल्या आहेत.