सलग १५ व्या महिन्यांत घाऊक महागाई दराचा उणे प्रवास
सलग १५ व्या महिन्यात उणे प्रवास कायम ठेवत, सरलेल्या जानेवारी महिन्यातही (-) ०.९ टक्के पातळीवर राहिलेल्या घाऊक किमतींवर आधारित महागाई दराने व्याजदर कपातीच्या दृष्टीने उद्योग क्षेत्राच्या आशा पल्लवित केल्या आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर कपात करावी, अशा उद्योग क्षेत्रातून मागणीला त्यामुळे पुन्हा जोर आल्याचे आढळून आले.
उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अ‍ॅसोचॅम या संघटनेचे अध्यक्ष सुनील कनोरिया यांनी, रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षित उद्दिष्टांनुरूप महागाई दर नियंत्रणात राहिला असल्याने आगामी द्विमाही पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर कमी केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर फिक्कीचे सचिव दीदार सिंग यांनीही याच मागणीची री ओढत, विशेषत: प्रतिकूल बाह्य़ परिस्थितीत देशांतर्गत मागणीत उभारी आणि उद्योग क्षेत्राच्या वाढीला पूरक व्याजदर कपातीचा रिझव्‍‌र्ह बँकेने विचार करावा, असा आग्रह धरला. येत्या अर्थसंकल्पातून आर्थिक सुधारणांचा मार्ग आणखी सुकर होईल, याबद्दल आशा असल्याचेही त्यांनी सांगितले.
महागाई दर उणे ०.९ स्थितीत राहण्याबरोबरच, जानेवारीमध्ये अन्नधान्यातील महागाई दर हा डिसेंबरमधील ८.१७ टक्क्य़ांवरून ६.०२ टक्के असा घसरला आहे. शिवाय नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अनुक्रमे -३.४ टक्के आणि – १.३ टक्के असा आक्रसत गेलेला औद्योगिक उत्पादन दराच्या केविलवाण्या स्थितीकडेही रिझव्‍‌र्ह बँकेचे लक्ष वेधले जात आहे.