कधीही भाकीत न करता येणाऱ्या खर्चापकी एक म्हणजे आजारपण! मृत्यू, अपघात आजारपण अंदाज न घेता दारी उभे ठाकणारे अटळ प्रसंग. दोन दशकांपूर्वी भारतीयांचे जीवनमान लक्षात घेतले तर किमान ५५ वय वष्रेपर्यंत शारीरिक व्याधींची शक्यता कमी प्रमाणात होती. स्पर्धात्मक जीवनशैलीचा अभाव, स्वताई, उत्तम कौटुंबिक व्यवस्था या ठळक कारणांमुळे, ताण-तणावांमुळे उद्भवणारे विकार बळावलेले नव्हते.
सध्याचे वास्तव मात्र अधिक चिंताजनक आहे. जीवनशैलीशी निगडीत विकार म्हणजे रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आजकाल ३० ते ३५ वयोगटातही आढळू लागले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात जास्त हृदयरोगी भारतीय असण्यास फारसा अवधी उरलेला नाही. ज्या वेगाने जीवघेणे आजार वाढत आहेत त्याच वेगाने आजारांवर मात करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानही विकसित होत आहे. त्यातही आनंदाची बाब म्हणजे शहरीकरणामुळे, माहितीच्या वेगवान प्रसारणामुळे आरोग्य सुविधांची उत्तमोत्तम तंत्रज्ञाने विकसित झाली आहेत. भारत जागतिक दर्जाची आरोग्यसुविधा अत्यंत वाजवी खर्चात उपलब्ध करुन देणारे राष्ट्र म्हणून परदेशी पर्यटकांना आकर्षून घेत आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील महागाईचा दर १५%आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर २०१५ रोजी १०० रुपयांना मिळणारी वैद्यकीय सुविधा, औषधे २०२० मध्ये दुप्पट किंमतीत उपलब्ध होणार आहे.
नोकरदार, मध्यमवर्ग, चाकरमानी वर्ग आरोग्यविम्याविषयी गोंधळलेला आढळतो. ऐकीव माहितीवर अवलंबून बहुतांशवेळा गरसमजुतीतून आरोग्यविम्याची गुंतवणूक बेजबाबदारपणे करताना दिसतो. सर्वसामान्य ग्राहकांना परवलीचा वाटणारा तांत्रिक विषय सोप्यासुलभ भाषेत उकल करून देण्यासाठी आरोग्यविमाविषयी अधिक प्रसार आवश्यक आहे. आरोग्यविमा काढणे गरजेचे आहेच; तेवढेच महत्वाचे आहे आजीवन विमा हप्ता न चुकता भरणे.
भारतीय आरोग्यविमा पॉलीसी मुख्यत्त्वे ही रुग्णाची आजारपणात रुग्णालय भरती झाल्यास नुकसानभरपाई करते. ग्राहकाला विमा विविध विपणनमार्गानी (Marketing Channels) उपलब्ध आहे. बँका, ऑनलाईन सुविधा, विमाब्रोकर, विमाएजंट, Group Insuranceचे विविध पर्यायांमार्फत आरोग्य विमा पॉलीसी विकत घेता येते. ग्राहकास प्रामुख्याने वरिष्ठ नागरिकांस पर्यायाची माहिती सुलभ सोप्या पध्दतीने समजावून सांगणे ही जबाबदारी प्रत्येक विमा कंपनीच्या विपणन (Marketing) प्रशिक्षण (Training) व्यवस्थेची आहे. तरीही प्रत्यक्षात असे घडतेच असं नाही. अनुभवी प्रशिक्षणाचा अभाव, केवळ प्रिमियमशी तुलना करुन निर्णय घेणे, आजारांविषयांची माहिती लपवून पॉलिसी उतरवणे, विमादावा (Claims) संबंधित कागदपत्रांची जमवाजमव करताना निष्काळजीपणा अशा अनेक कारणांमुळे भारतीय आरोग्यविमासुरक्षा ग्राहकवर्गापर्यत पोहचलेला नाही. लेखिका प्रमाणित वित्तीय नियोजनकार व वित्तीय नियोजन संघटनेच्या सदस्या आहेत.

आरोग्यविम्याविषयी थोडक्यात महत्त्वाचे :
आरोग्यविमा बँकेत बचत खाते उघडण्याइतकी महत्वाची बाब आहे.
किमान ५ लाख रुपये व्यक्तिगत आरोग्यविमा छत्र सर्वसामान्य गुंतवणुकीदाराकडे असणे गरजेचे आहे.
किमान १० लाख रुपये कौटुंबिक आरोग्यविमा छत्र चार सदस्यांच्या कुटुंबाकरता आवश्यक आहे.
वरिष्ठ नागरिकांना आरोग्यविमा घेणे अटळ आहे. वाढते आर्युमान लक्षात घेता निवृत्तीनंतर निवृत्तवेतनाची गुंतवणूक करण्याआधी आरोग्यविमाविषयी सुयोग्य निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे.