डिसेंबरच्या प्रारंभी जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदर कपातीविषयी उद्योग क्षेत्राकडून सुरू असलेल्या दबावतंत्राला सबळ कारण मिळाले आहे. किरकोळ पाठोपाठ घाऊक किंमत निर्देशांकही किमान स्तराला आला आहे. १.७७ टक्के या ऑक्टोबरमधील महागाई दराने गेल्या पाच वर्षांतील तळ दाखविला आहे.
दोन दिवसांपूर्वीच किरकोळ महागाई दराचा ऑक्टोबरमधील ५.५२ टक्के हा दोन वर्षांतील किमान स्तर जाहीर झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित ऑक्टोबरमधील महागाई दरही आता १.७७ टक्क्य़ांवर घसरला आहे. इंधन तसेच अन्नधान्याच्या किमती घसरल्याने सप्टेंबरमधील २.३८ टक्क्य़ांच्या तुलनेत हा दर यंदा लक्षणीय घसरला आहे.
किरकोळ महागाई दर हा सलग चौथ्या महिन्यात सावरला होता; तर घाऊक किंमत महागाई निर्देशांकदेखील सलग पाचव्या महिन्यात घसरत आला आहे. घाऊक किंमत निर्देशांक वर्षभरापूर्वी, ऑक्टोबर २०१३ मध्ये ७.२४ टक्क्य़ांवर होता. तर यंदा या निर्देशांकातील २.७ टक्के हा अन्नधान्य महागाई दर जवळपास अडीच वर्षांच्या नीचांक स्तरावर आहे. मेपासून हा दरदेखील कमी होत आहे.
स्वयंपाकाचा गॅस, डिझेलचा समावेश असलेला तेल व ऊर्जा महागाई दर आधीच्या महिन्यातील १.३३ टक्क्य़ांच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ०.४३ टक्क्य़ांवर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमालीचे खाली येत असताना इंधन महागाई दर येत्या कालावधीत आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात कांद्याचे दर ५९.७७ टक्क्य़ांनी घसरले आहेत. तर बटाटय़ाच्या किमती ८२.११ टक्क्य़ांनी घसरल्या आहेत. एकूण भाज्यांच्या किमती १९.६१ टक्क्य़ांनी कमी झाल्या आहेत. मांसाहरी पदार्थाच्या किमती मात्र २.५८ टक्क्य़ांनी वधारल्या आहेत. साखर, खाद्यतेल, पेय आदींच्या किमती २.४३ टक्क्य़ांनी घसरल्या आहेत.
अन्नधान्याच्या किमती आणखी घटण्याचा अर्थमंत्र्यांना विश्वास
पाच वर्षांच्या तळाला पोहोचलेला महागाई दर येत्या काही कालावधीत आणखी खाली येताना दिसेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमालीने घसरत आहेत. भारतासारख्या देशासाठी ते हिताचे आहे. याचबरोबर देशातील अन्नधान्यांच्या किमतीही आणखी कमी होण्याची शक्यता आहे. २.५ टक्के हा दर खूप अधिक नसला तरी औद्योगिक उत्पादनाबाबतही आशादायक चित्र आहे. सरकारने निर्धारीत केलेल्या प्रगतीच्या दिशेने पावलेही टाकली आहेत. त्याचा नेमका परिणाम लवकरच दिसून येईल.