भाज्या आणि इतर खाद्यपदार्थांच्या किंमती घसरल्याने ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाईच्या दराने गेल्या पाच वर्षातील निच्चांकाची नोंद केली. ऑगस्ट महिन्यातील घाऊक महागाईचा दर ३.७४ टक्के इतका नोंदविण्यात आला. मागील वर्षी घाऊक किंमतीच्या निर्देशांकांनुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील महागाईचा दर अनुक्रमे ५.१९ आणि ६.९९ टक्के इतका होता. मात्र, यंदा जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये खाद्यक्षेत्रातील महागाईच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली. खाद्यक्षेत्रातील महागाईचा दर जुलैमध्ये ८.४३ टक्के इतका होता, तो ऑगस्ट महिन्यात ५.१५ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. यापूर्वी ऑक्टोबर २००९मध्ये घाऊक किंमतीच्या निर्देशांकांनुसार १.८ टक्के इतक्या सर्वात कमी महागाई दराची नोंद करण्यात आली होती. यंदा ऑगस्ट महिन्यात भाज्या, कांदे यांच्या दरात मोठी घट झाली असली तरी, स्वयंपांकघरात लागणाऱ्या इतर गोष्टींच्या किंमतीचा महागाई दर जुलै महिन्याच्या तुलनेत चढाच राहिला आहे.
ऑगस्ट महिन्यात अंडी, मांस आणि मासे यांच्या किंमती घसरल्या आहेत, तर दूध आणि कडधान्याच्या किंमतीचा महागाई दर जुलै महिन्याच्या तुलनेत वाढून अनुक्रमे १२.१८ आणि ७.८१ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. घाऊक किंमतीच्या निर्देशांकांनुसार साखर आणि खाद्यतेलाच्या किंमतीमध्येही घट झाली आहे. तर दुसरीकडे, जुलै महिन्यात ७.९६ टक्के असणारा किरकोळ महागाई दरामध्येही घट होऊन ऑगस्ट महिन्यात हा दर ७.८० टक्क्यांवर आला आहे.