उणे स्थितीतच पण (-) १.९९ टक्क्य़ांवरून डिसेंबरमध्ये (-)०.७३ टक्क्य़ांपर्यंत वाढ

देशातील उणे स्थितीतील घाऊक महागाईचा दर सलग चौथ्या महिन्यात उंचावला असून तो आता गेल्या वर्षभराच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. डिसेंबरमधील त्याच्या (-)०.७३ टक्के दरावर वाढत्या अन्नधान्यावरील महागाईचा दबाव कायम राहिला आहे.

गेल्या महिन्यातील महागाईचा घाऊक किंमत निर्देशांक सलग चौथ्या महिन्यात वाढला आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये हा दर (-)१.९९ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०१४ मध्ये हा दर (-)०.५० टक्के होता. २०१५ मधील ऑक्टोबर व सप्टेंबरमध्ये हा दर अनुक्रमे (-)३.७ व (-)४.६ टक्के होता.

डाळी, कांदा, भाज्यांचे दर चढेच

अन्नधान्याचा महागाई दर डिसेंबर २०१५ मध्ये ८.१७ टक्क्यांवर गेला आहे. आधीच्या, नोव्हेंबरमध्ये तो ५.२० टक्के होता. डाळी, कांदा या गेल्या अनेक महिन्यांपासूनच्या चर्चेतील वस्तूंनी यंदाच्या अन्नधान्य महागाई दरात भर घातली आहे. दोन्ही जिनसांच्या किमती अनुक्रमे ५५.६४ व २५.९८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर भाज्यांच्या किमती २०.५६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर फळेही ०.७६ टक्क्यांनी महाग झाली आहेत.

बटाटे (-३४.९९ टक्के), अंडी, मटण, मांस (५.०३ टक्के) यांच्या किंमतीही वाढल्या आहेत.

कमी मागणीचा निदर्शक कल!

उणे स्थितीतील महागाईचा कल अर्थव्यवस्थेत कमी मागणी असल्याचे दर्शवितो, असे मत फिक्की या उद्योग संघटनेने व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत रिझव्‍‌र्ह बँकेने येत्या पतधोरणात योग्य तो प्रतिसाद देऊन अर्थव्यवस्थेला चालना देण्याची अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे. सातत्याने घसरणारा महागाई दर हा देशातील निर्मिती क्षेत्रावर विपरीत परिणाम नोंदवीत असल्याचे अन्य एक उद्योग मंच असोचेमने म्हटले आहे. त्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेचा रोख आता विकासाच्या दिशेने हवा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली  आहे.

महागाई वाढत असली तरी आणि औद्योगिक क्षेत्राची प्रगती फारशी नसली तरी फेब्रुवारी अखेरच्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत व्याजदर कपात होण्याची शक्यता कमी असल्याचे मत इक्राच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केले आहे. सलग पाचव्या महिन्यात वाढलेल्या डिसेंबरमधील किरकोळ महागाई दरही दोनच दिवसांपूर्वी जाहीर झाला. तर नोव्हेंबर २०१५ मधील देशातील औद्योगिक उत्पादनही मंदावतेच राहिले आहे.