कॉग्निझन्टमधील सहा ते १० हजार नोकऱ्यांवर कपातीचे सावट

इन्फोसिस, विप्रो आणि टीसीएस यांच्या पाठोपाठ न्यू जर्सी येथे मुख्यालय असलेल्या परंतु भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लक्षणीय अस्तित्व असलेल्या कॉग्निझन्टकडून ६,००० ते १०,००० नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. या सॉफ्टवेअर सेवा कंपनीच्या चेन्नईतील केंद्रामधून कामगिरीत कमअस्सल व अतिरिक्त ठरलेल्या बहुताशांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे.

वार्षिक कामगिरीच्या मूल्यमापनाची नित्य (अप्रायझल) चालू महिन्यात सुरू असून, त्यायोगेच कॉग्निझन्टकडून अपेक्षित नोकर कपात केली जाईल. जगभरात एकूण २.६० लाख मनुष्यबळ असलेल्या कॉग्निझन्टकडून जवळपास २ टक्के नोकरदारांना कमी केले जाईल, असे अधिकृत सूत्रांकडून समजते. या प्रमाणात वाढीची शक्यताही नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

विश्लेषकांच्या मते, माहिती—तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक पारंपरिक स्वरूपाची कामे व पदे ही वाढत्या  स्वयंचलितीकरणातून अनावश्यक ठरत आहेत. शिवाय तंत्रज्ञानाचा झपाटय़ाने बदलत असलेला पट आणि नव्या धाटणीच्या डिजिटल सेवांकडील वाढता कल यातून भारतीय आयटी कंपन्यांना नवीन कंत्राटे मिळविणेही आव्हानात्मक ठरत आहे. भारतीय कंपन्यांकडून नव्हे तर जागतिक अग्रणी तंत्रज्ञान कंपन्यांकडूनही नोकऱ्यांना कात्री बसत आहे. सिस्कोने २०१७ सालात मनुष्यबळ ७ टक्कय़ांनी कमी करण्याचे, तर आयबीएमने ५,००० कर्मचाऱ्यांच्या कपातीचे नियोजन यापूर्वीच जाहीर केले आहे. तर भारतातील आपला स्मार्ट फोन्सचा व्यवसाय गुंडाळल्याने २,८०० कर्मचाऱ्यांना घरी बसविले आहे.

नवीन रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने आशेने पाहिले जाणाऱ्या नव्या युगाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोद्य्गी (स्टार्ट अप्स) कंपन्या आणि ई—व्यापार कंपन्यांमध्ये नोकरकपातीचे जोरदार वारे सुरू आहेत.

‘झिनोव’ या सल्लागार संस्थेच्या कयासाप्रमाणे आगामी चार वर्षांंत नवीन तंत्रज्ञानात्मक बदलामुळे केवळ भारताच्या आयटी क्षेत्रातून ९४,००० च्या घरात नोकऱ्या लुप्त होतील. या उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नासकॉमने अलीकडेच मुंबईत आयोजित वार्षिक परिषदेत, पुढील तीन वर्षांत २०—२५ टक्कय़ांनी नोकऱ्या कमी होतील, असे भाकीत केले आहे. तर २०१६—१७ मध्ये नव्याने नोकरभरती केवळ ५ टक्के झाल्याचे तिने स्पष्ट केले आहे. कॅम्पस भरतीचे प्रमाण सरलेल्या वर्षांत तब्बल ४० टक्कय़ांनी घटल्याचेही आढळून आले.