देशातील सॉफ्टवेअर निर्यातीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी इन्फोसिसने एकूण अपेक्षेच्या विपरीत सरलेल्या मार्च तिमाहीत उत्पन्नात (अमेरिकी डॉलरमधील) दर्शविलेल्या २.६ टक्क्यांच्या घसरणीने निराशा केली. कंपनीने भागधारकांना वाढीव लाभांश तसेच एकास एक या प्रमाणे बक्षीस समभागाची घोषणाही गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण करू शकली नाही आणि कंपनीच्या समभाग शुक्रवारच्या व्यवहारात दणदणीत सात टक्क्यांनी आपटला. निफ्टी निर्देशांकात या समभागाचा वरचष्मा असल्याने त्याने घेतलेल्या मोठय़ा गटांगळीने बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांतील घसरणीसही हातभार लावला.
तिमाही कामगिरीची ठळक वैशिष्टय़े..
*इन्फोसिसचा डॉलरमधील महसूल तिमाहीगणिक २.६ टक्क्यांनी घसरला. चलनाच्या दरात चंचलता असतानाही, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि विप्रो या स्पर्धक कंपन्यांबाबतीत डॉलरमधील महसूल अनुक्रमे १.६ टक्के, २.७ टक्के आणि १.२ टक्के असा याच तिमाहीत वधारला आहे.
*२०१४-१५ संपूर्ण वर्षांत इन्फोसिसने डॉलरमधील महसुलात ५.६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, जी तिने निर्देशित केलेल्या ७ ते ९ टक्के अंदाजापेक्षा खूप कमी आहे. तरी २०१५-१६ साठी इन्फोसिसने वाढीव असा १० ते १२ टक्के दराने महसुली वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
*अमेरिकेतील कॅलिडस इन्क. या कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा
*यंदा भागधारकांना वाढीव ५० टक्के दराने लाभांश वितरण (आजवरचे धोरण हे ४० टक्के लाभांश वितरणाचे होते.)
*प्रति समभाग २९.५० रुपये अंतिम लाभांश आणि १:१ प्रमाणात बक्षीस समभागाची भागधारकांना प्राप्ती होणार
*कंपनीतील कर्मचारी गळतीत पहिल्या तिमाहीतील २३.४ टक्क्यांवरून, सरलेल्या चौथ्या तिमाहीपर्यंत १३.४ टक्क्यांपर्यंत घसरण

एकंदर उद्योग क्षेत्राचा मूलभूत व रचनात्मक संक्रमणातून प्रवास सुरू आहे. एक अतिशय खडतर तिमाहीनंतरही, आम्ही नव्याने योजलेल्या ‘रिन्यू’ या डावपेचात्मक नियोजनाच्या प्रारंभिक यशाने मी उत्साहित आहे.
-विशाल सिक्का, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, इन्फोसिस