गेल्या तब्बल चार वर्षांच्या वरच्या टप्प्यावर असलेली देशातील पायाभूत सेवा क्षेत्राची वाढ मे महिन्याअखेर मात्र पाच महिन्यांच्या तळात स्थिरावली असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. एप्रिलमधील ८.५ टक्क्यांच्या तुलनेत या क्षेत्राची वाढ मे २०१६ मध्ये २.८ टक्के नोंदली गेली.
प्रामुख्याने तेल व नैसर्गिक वायू उत्पादनात झालेल्या घसरणीने गेल्या महिन्यात प्रमुख आठ क्षेत्रांतील क्षेत्राची वाढ खुंटली आहे. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धिकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट आणि ऊर्जा असा समावेश असलेल्या या क्षेत्राने वर्षभरापूर्वी, मे २०१५ मध्ये ४.४ टक्के असा प्रवास नोंदविला होता. देशाच्या औद्योगिक उत्पादनात ही आठ प्रमुख क्षेत्रे ३८ टक्के इतका हिस्सा राखतात.
एप्रिल या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात या क्षेत्राने ८.५ टक्के वाढ नोंदविताना गेल्या चार वर्षांतील सर्वोत्तम प्रवास नोंदविला होता. शुद्धिकरण उत्पादने व ऊर्जा निर्मितीतील दोन अंकी आकडय़ांच्या वाढीच्या जोरावर पायाभूत सेवा क्षेत्राने हे यश राखले होते. मेमधील वाढ ही डिसेंबर २०१५ नंतरची किमान वाढ आहे. या दरम्यान या क्षेत्राची वृद्धी अवघी ०.९ टक्के झाली होती. गेल्या महिन्यात खनिज तेल (-३.३ टक्के) व नैसर्गिक वायू (-६.९ टक्के) क्षेत्राने नकारात्मक वाढ नोंदविली आहे.
मेमध्ये सिमेंट (२.४ टक्के) व ऊर्जा (४.६ टक्के) क्षेत्र वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत घसरले आहे. मे २०१५ मध्ये ते अनुक्रमे २.७ व ६ टक्के दराने वाढले होते. मे २०१५ मधील ७.६ टक्क्यांच्या तुलनेत यंदा कोळसा उत्पादनही ५.५ टक्क्यांनी घसरले आहे. केवळ खते आणि पोलाद उत्पादन क्षेत्रात यंदा अनुक्रमे १४.८ व ३.२ टक्के वाढ नोंदली गेली.
आर्थिक वर्ष २०१६-१७च्या एप्रिल व मे या पहिल्या दोन महिन्यात प्रमुख आठ क्षेत्र वर्षभरापूर्वीच्या २.१ टक्क्यांच्या तुलनेत ५.५ टक्क्याने विस्तारले आहे.