देशातील पायाभूत सेवा क्षेत्राची वाढ जुलै २०१५ मध्ये १.१ टक्क्य़ांवर येताना तिमाहीच्या तळात विसावली आहे. खनिज तेल, नैसर्गिक वायू, पोलाद आदी उत्पादन रोडावल्याचा फटका एकूण सेवा क्षेत्राला बसला आहे.
एकूण औद्योगिक उत्पादनात प्रमुख आठ क्षेत्राचा हिस्सा ३८ टक्के हिस्सा आहे. हे क्षेत्र वर्षभरापूर्वी, जुलै २०१४ मध्ये ४.१ टक्के होते. मार्च व एप्रिल २०१५ मध्ये प्रमुख आठ क्षेत्राची वाढ अनुक्रमे ०.१ व ०.४ टक्क्य़ांनी कमी झाली आहे. मे व जूनमध्ये ती अनुक्रमे ४.४ व ३ टक्के उंचावली होती. एप्रिल ते जुलै या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या चार महिन्यात प्रमुख क्षेत्राची वाढ २.१ टक्क्य़ांनी झाली आहे. मात्र आधीच्या वर्षांतील याच दरम्यानच्या कालावधीतील ५.५ टक्क्य़ांपेक्षा ती निम्म्याहूनही कमी आहे. २०१४-१५ मध्ये हे क्षेत्र ३.५ टक्क्य़ांनी विस्तारले आहे. आधीच्या वर्षांतील ४.२ टक्क्य़ांपेक्षाही ते कमी आहे.
वाणिज्य व उद्योग खात्याने स्पष्ट केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये खनिज तेल, नैसर्गिक वायू तसेच पोलाद उत्पादन वार्षिक तुलनेत अनुक्रमे ०.४, ४.४ व २.६ टक्क्य़ांनी कमी झाले आहे.
त्याचबरोबर कोळसा, सिमेंट व ऊर्जा निर्मितीही अनुक्रमे ०.३, १.३ व ३.५ टक्क्य़ांनी रोडावली आहे. तेल व वायू शुद्धीकरण उत्पादने तसेच खत निर्मिती मात्र अनुक्रमे २.९ व ८.६ टक्क्य़ांनी वाढले आहे.