सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय ‘फीडर फंडा’त गुंतवणूक फायद्याची ठरेल?
विविधता अर्थात डायव्हर्सिफिकेशन हा कोणत्याही सुज्ञ गुंतवणुकीचा मूलमंत्रच म्हणायला हवा. आजच्या आधुनिक काळात गुंतवणुकीशी निगडित जोखमीचे प्रमाण पाहता, आपला सर्व पैसा एकाऐवजी अनेकांगी गुंतवणूक पर्यायांमध्ये विभागलेला असणे केव्हाही महत्त्वाचेच ठरेल. पण ही विविधता वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमधून जशी साधता येते, तशी ती वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांत करूनही साधली जाऊ शकते.
जागतिकीकरणाच्या आजच्या युगात आपल्या गुंतवणूक डावपेचांनाही जागतिक पैलू असायला हवा. भारताच्या गुंतवणूकविश्वाची कवाडे जागतिक भांडवली बाजारासाठी खुली होण्यापूर्वी, विविधता ही वेगवेगळ्या उपलब्ध पर्यायांमध्ये गुंतवणूकयोग्य निधीचे विभाजनापुरतीच मर्यादित होती, परंतु २००४ सालानंतर भारतीय गुंतवणूकदारांना विदेशात गुंतवणुकीची मुभा मिळाली आणि गुंतवणूक वैविध्याला नवा संदर्भ प्राप्त झाला.
उदार धन प्रेषण योजना (लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम- एलआरएस) या अंतर्गत भारतीयांना दर साल सव्वा लाख अमेरिकी डॉलर इतका निधी विदेशात गुंतविता येतो. पण ही रक्कम थेट विदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणे हे कायदेशीर व करविषयक मुद्दय़ांमुळे बरेच कटकटीचे ठरेल. त्यामुळे म्युच्युअल फंड हा विदेशात गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
विदेशातील म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे तीन प्रकार आहेत.
 १.    जागतिक बाजारपेठेत थेट गुंतवणूक करणारे फंड
 २.    दुसरा प्रकार फीडर फंडांचा आहे. प्रस्थापित ग्लोबल फंडांमध्ये या फंडातून गुंतवणूक केली जाते.
 ३.    तिसरा प्रकार हा फंड ऑफ फंड्स धाटणीचा आहे. हा असा फंड आहे जो अनेक प्रकारच्या फंडात गुंतवणूक करीत असतो. याचा फायदा असा की, एकीकडे आपल्या पैशाला आंतरराष्ट्रीय पंख प्राप्त होतात, त्याच वेळी एकाच फंडातून अनेक प्रदेशात व अनेक फंडात गुंतवणूक विभागली गेल्याने जोखीमही कमी होते.
वैविध्यासाठी आंतरराष्ट्रीय फंडातच गुंतवणूक का?
हा एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न आहे. पण त्याला उत्तर देणारी सबळ कारणेही आहेत.
 १.    देशांतर्गत जोखमीपासून आंतरराष्ट्रीय फंड तुमच्या गुंतवणुकीचा बचाव करतील.  
 २.    अन्य उदयोन्मुख देशातील शेअर बाजारांच्या दमदार कामगिरी व परताव्याचा तुम्हाला लाभ मिळेल.
 ३.    सध्याच्या संदर्भात तब्बल सहा वर्षांच्या मंदी व साचलेपणातून जागतिक अर्थकारणाने उभारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर भांडवली बाजाराच्या संभाव्य तेजीत सहभाग गुंतवणूकदारांसाठी लाभकारकच ठरेल.
भारतातील अनेक डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांच्याही गुंतवणूक उद्दिष्टात ३५ टक्क्यांपर्यंत निधी हा विदेशातील बाजारांमध्ये गुंतवणुकीचा असतो. या पर्यायाचाही गुंतवणूकदारांना विचार करता येईल आणि कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणुकीतून त्यांना करमुक्त परताव्याचे लाभ मिळविता येतील. टेम्पल्टन इंडिया इक्विटी इन्कम फंडाचे या संदर्भात सर्वोत्तम उदाहरण ठरेल. या फंडाने गेल्या आठ वर्षांत वार्षिक १३.९ टक्के असा दमदार दराने परतावा दिला आहे.
शेअर्सव्यतिरिक्त अन्य मालमत्ता पर्याय
आंतरराष्ट्रीय थीमॅटिक फंडही आहेत. जे शेअर्सव्यतिरिक्त अन्य मालमत्ता पर्यायात गुंतवणुकीची संधी बहाल करतात. जसे आंतरराष्ट्रीय कमॉडिटी फंड, ऑइल फंड्स, गोल्ड फंड्स आणि अ‍ॅग्री-बिझनेस फंड्स वगैरे. या प्रत्येक फंडाबाबत एक ना अनेक प्रकारची जोखीम आहेच, शिवाय गुंतवणूकही गुंतागुंतीची आहे. या फंडात गुंतवणूक करताना वेळ (टाइमिंग) खूपच महत्त्वाची असते. सध्याच्या घडीला सोने आणि कच्चे तेल यांच्या किमतीला उतार लागल्याने त्यामधील गुंतवणुकीची रयाच निघून गेली आहे. नजीकच्या काळात किमती सुधारतील अशी शक्यताही दिसून येत नाही. त्यामुळे अशा थीमॅटिक फंडांच्या नादाला न लागणेच बरे.
खबरदारी काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावर इक्विटी फंडात गुंतवणूक करताना, वैविध्यातून जोखीम संरक्षण हा एकच घटक केवळ लक्षात असायला हवा. गेल्या वर्षभरात देशांतर्गत भांडवली बाजाराचे चित्र पालटले आहे आणि देशांतर्गत गुंतवणूक असलेल्या इक्विटी फंडांची कामगिरी ही आंतरराष्ट्रीय फंडांच्या तुलनेत उजवी राहिली आहे. पण तरी काही आंतरराष्ट्रीय फंडांनी या स्थितीतही उजवी कामगिरी केली आहे. जसे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल यूएस अपॉच्र्युनिटीज् फंडाने गेल्या वर्षभरात २० टक्क्यांनी परतावा दिला आहे. (अमेरिकी डॉलरचा परतावा भारतीय रुपयांत गृहीत धरल्यास). त्यामुळे नि:संशय भारताच्या भांडवली बाजार दीर्घावधीत मोठय़ा तेजीकडे अग्रेसर असला तरी आपल्या गुंतवणूक भांडारात काहीसे वैविध्य म्हणून आंतरराष्ट्रीय फंडांमध्ये गुंतवणुकीचा जरूर विचार करता येईल.
’  डॉ. व्ही के विजयकुमार
(जिओजित बीएनपी परिबा या दलाली संस्थेचे गुंतवणूक विशेषज्ज्ञ )

उपलब्ध पर्याय कोणते?
भारतीयांच्या गुंतवणुकीला आंतरराष्ट्रीय पंख बहाल करणारे सध्या म्युच्युअल फंडांकडून उपलब्ध असलेले विविध पर्याय
*फ्रँकलिन टेम्पल्टन इंडिया फीडर
*फ्रँकलिन यूएस अपॉच्र्युनिटीज फंड
*डीएसपी ब्लॅकरॉक यूएस
*फ्लेक्झिबल इक्विटी फंड
*बिर्ला सन लाइफ इंटरनॅशनल इक्विटी प्लॅन
*आयसीआयसीआय प्रुडेन्शियल यूएस ब्लूचीप इक्विटी
*टाटा ग्रोइंग इकॉनॉमीज् फंड
*टेम्पल्टन इंडिया इक्विटी इन्कम फंड
*कोटक इमर्जिग मार्केट फंड

* ‘फीडर फंडां’ना उतरती कळा
प्रमुख आंतरराष्ट्रीय चलनांच्या तुलनेत कमकुवत बनलेले भारतीय चलन अर्थात रुपया ही आंतरराष्ट्रीय फंडात गुंतवणुकीतून चांगला परताव्याच्या प्राप्तिचा मुख्य घटक ठरला आहे. रुपया गेले काही महिने प्रति डॉलर ६०-६२ या निमुळत्या पातळ्यांदरम्यान म्हणजे तुलनेने स्थिर राहिला आहे. परिणामी भारतातील म्युच्युअल फंडांची ‘आंतरराष्ट्रीय फीडर फंड’ प्रस्तुत करण्याची गेल्या वर्षी दिसलेली चढाओढही शमली आहे. सरलेल्या २०१३ सालात ३३ आंतरराष्ट्रीय फंड दाखल झाले होते, त्या तुलनेत हे प्रमाण पाच इतके मर्यादित आहे. गेल्या वर्षी या फंडांकडून सुमारे ३,००० कोटींची गंगाजळी गुंतवणूकदारांकडून गोळा करण्यात आली होती.