म्युच्युअल फंड गंगाजळीत १३.५ टक्के भर

म्युच्युअल फंडाकडे असलेला छोटय़ा शहरांमधील गुंतवणुकीचा कल वाढल्याचे समोर आले आहे. या शहरांमधून या प्रकारातील गुंतवणूक १३.५ टक्क्य़ांनी वाढून ती २.१४ लाख कोटी रुपये झाली आहे.

म्युच्युअल फंड उद्योगांची संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया)ने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यात १५ बडय़ा शहरांव्यतिरिक्त फंडातील गुंतवणूक २,१४,५२८ कोटी रुपये झाली आहे. वार्षिक तुलनेत ही वाढ १४.५ टक्के नोंदली गेली आहे.

भांडवली बाजारातील गेल्या काही महिन्यातील अस्वस्थतेनंतरही फंडातील गंगाजळी या भागातून वाढल्याचे दिसून येते. समभाग निगडित फंड प्रकारातील वाढ लक्षणीय आहे. नवी दिल्ली परिसर, ठाणे-नवी मुंबईसह मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद, बडोदा, चंदीगड, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, पणजी, पुणे व सुरतव्यतिरिक्त ही शहरे होत. देशभरातील ४४ फंड घराण्यांची एकूण मालमत्ता डिसेंबर २०१५ अखेर १२.७४ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.